विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात....
Updated: Oct 22, 2024, 09:31 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २२ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजतापर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २९ ऑक्टोबरपर्यंत आहे. यावेळी एक उमेदवाराला चार अर्ज तसेच दोन मतदार संघात अर्ज दाखल करता येणार आहे.
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचाली वाढल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आता काही दिवसच राहिले असल्याने इच्छुकांची धावपळ होत आहे. त्यातच उमेदवारीचे निश्चित होत नसल्याने कागदपत्रे गोळा करण्याविषयी संभ्रम आहे. काही उमेदवारांनी तर अपक्ष निवडणक लढवण्यासाठी तयारी केली आहे. उमेदवारांनी अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करून निर्धारित वेळेत अर्ज दाखल करावे अशा सूचना देण्यात आल्या. त्यात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र विहीत नमुना भरावा, शपथपत्र नमुना २६ प्रथम वर्ग दंडाधिकारी - नोटरी यांच्या समक्ष स्वाक्षरी करून सादर करावा, उमेदवाराने मतपत्रिकेवरील छायाचित्राबाबतचे घोषणापत्र सादर करावे, मतपत्रिकेवर नाव कसे असावे, याबाबत उमेदवारांनी लेखी पत्र द्यावे. एक उमेदवार जास्तीत जास्त चार अर्ज दाखल करू शकतो. एक उमेदवार दोनपेक्षा जास्त मतदारसंघांत अर्ज करू शकणार नाही, असा नियम आहे....