शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, महागाई आभाळाला भिडली! महायुतीवाल्यांच्या भूलथापांना बळी पडू नका! चिखलीच्या सभेतून सचिन पायलट गरजले;म्हणाले, महायुतीवाल्यांना केवळ सत्ता प्रिय....

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. येणाऱ्या काळात देशाचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार आहे याचे दर्शन या निवडणुकीतून होणार आहे. देशात आणि राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात, महागाई आभाळ भिडली आहे मात्र एवढे असले तरी महायुतीवाल्यांना सत्ता प्रिय आहे असे म्हणत विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या भूलथापांना बळी न पडता महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी केले. चिखली येथे आज महाविकास आघाडीची जाहीर सभा जाफ्राबाद रोडवरील वीट भट्टीच्या मैदानाजवळ पार पडली. यावेळी पायलट बोलत होते...

 
पुढे बोलतांना सचिन पायलट म्हणाले की, सत्ता पैसा आणि दडपशाहीसमोर आता जनता झुकणार नाही हेच इथे जमलेली गर्दी दाखवून देत आहे. देशात महिला सुरक्षित नाहीत शेतकरी संकटात आहे. मात्र याही परिस्थितीत महायुतीवाल्यांना केवळ सत्ता दिसते असा चिमटा देखील सचिन पायलट यांनी यावेळी काढला. भाजपवाल्यांनी संविधाना सोबत छेडछाड केली. मात्र महाराष्ट्राच्या जनतेने ही हुशारी ओळखली आणि लोकसभा निवडणुकीत त्यांना धडा शिकवला. इथे राहुल बोंद्रे निवडणूक लढवत नाहीत तर तुमचे भविष्य निवडणूक लढवत आहे असेही पायलट म्हणाले. देशात आणि राज्यात तोडफोडीचे राजकारण सुरू आहे तर महाविकास आघाडी जोडण्याचे राजकारण करत आहे असेही पायलट म्हणाले. राहुल बोंद्रे यांच्यासह बुलडाणा जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी सचिन पायलट यांनी केले..