विकसित कृषी संकल्प अभियानाच्या माध्यमातून शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद अधिक दृढ व्हावा ! केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे प्रतिपादन! केळवद येथे झाला खास कार्यक्रम.....
Jun 10, 2025, 08:52 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): “शेतीतील वैज्ञानिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यातून उत्पादनात वाढ साधण्यासाठी विकसित कृषी संकल्प अभियान अत्यंत मोलाची भूमिका बजावते,” असे प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी केले.
बुलढाणा तालुक्यातील केळवद येथे कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या विकसित कृषी संकल्प अभियानाच्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, आत्मा प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे, तहसीलदार संतोष काकडे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. अमोल झापे, डॉ. भारती तिजारे, डॉ. वाडकर, तसेच प्रगतशील शेतकरी प्रतापराव पाटील व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ना. जाधव म्हणाले की, "शेतकऱ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. मृदा परीक्षण, खत व्यवस्थापन, योग्य बियाण्यांची निवड, ड्रोनद्वारे फवारणी, जैविक कीटकनाशकांचा उपयोग, मूल्यवर्धन आणि प्रक्रिया यांसारख्या गोष्टींकडे अधिक लक्ष दिल्यास शेती नफ्याची ठरू शकते." त्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या खरीप आणि रब्बी हंगामातील प्रात्यक्षिकांचेही विशेष महत्त्व अधोरेखित केले आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भेट देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. यावेळी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक निविष्ठांचे प्रदर्शन आणि बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.
डॉ. अमोल झापे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, “कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या पद्धती समजावून देण्याचे कार्य सुरु आहे. या अभियानामुळे शेतकरी अधिक सक्षम होणार आहेत.”
डॉ. निर्मल कुमार (नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सायन्स, नागपूर) यांनी जमिनीच्या सुपीकतेचे व्यवस्थापन, ओलीत नियोजन व माती परीक्षणावर मार्गदर्शन केले. तर कृषी सखी सौ. वंदना टेकाळे यांनी शेतीपूरक प्रक्रिया उद्योगाच्या संधींची माहिती देत महिलांना प्रोत्साहित केले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी विविध शासकीय योजना, त्यासाठी लागणारी ऑनलाइन नोंदणी आणि तांत्रिक मदतीबाबत माहिती दिली. त्यांनी शेतकऱ्यांना अधिकाधिक योजना लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन योगेश सरोदे यांनी केले.