पातोंडा - पेडका येथील शेतकऱ्यांनी पटवारी दहातोंडे आणि कृषी सहायक चव्हाणांची तहसीलदारांकडे केली तक्रार! मोठा घोळ केला होता...

 
खामगाव
 खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):खामगाव तालुक्यातील पातोंडा - पेडका येथील शेतकऱ्यांनी पटवारी दहातोंडे, कृषी सहायक चव्हाण यांची तहसीलदार खामगाव यांच्याकडे तक्रार केली आहे. त्याला कारणही तसेच आहे. 

मार्च, एप्रिल मध्ये झालेल्या गारपीट मध्ये रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यावेळी शासनाने शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे सर्वे करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार कृषीविभाग कडून पातोंडा - पेडका येथील शेतीच्या पिकांचे सर्वे करण्यास पटवारी दहातोंडे, कृषी सहाय्यक चव्हाण हे दोन्ही अधिकारी सर्वे करून निघून गेले. या दोघांनी संगणमत करून काही शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन त्यांच्या मर्जीतील शेतकऱ्यांची यादी तयार केली, त्या नुकसानग्रस्त मंजूर यादीमध्ये काही शेतकऱ्यांजवळ बागायती करण्याकरता कोणतेही सिंचन उपलब्ध नाही त्या शेतकऱ्यांची शेती ही कोरडवाहू आहे.👇

उलट काही शेतकऱ्यांची शेती ही बागायती असून सुद्धा त्यांना लाभावापासून वंचित ठेवले आहे. त्यांच्यावर अन्याय केला आहे. मंजूर केलेले यादीमध्ये एकाच कुटुंबातील तीन ते चार शेतकरी घेतले आहेत. त्यांच्या नावे मोठी रक्कम सुद्धा त्यांनी टाकली आहे. मात्र खरंच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना शासनाच्या लाभापासून वंचित ठेवले आहे. अशी तक्रार काल २६ सप्टेंबर रोजी पातोंडा - पेडका येथील जवळपास तेवीस शेतकऱ्यांनी खामगाव तहसीलदार यांना केली आहे. आम्हाला योग्य तो न्याय देऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी या शेतकऱ्यांनी आपल्या विनंती अर्ज द्वारे तहसीलदार यांना केली आहे. तहसीलदार काय कारवाई करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.