EXCLUSIVE ज्यांनी आत्ता आत्ता प्रवेश केला ते आम्हाला निष्ठा शिकवतात! मेहकरच्या विराट जाहीर सभेतून आ. रायमुलकरांनी काढले विरोधकांचे वाभाडे;
म्हणाले, तुम्ही २० तारीख मला द्या, माझी ५ वर्षे तुमच्यासाठी!आमदार म्हणून नाही तर सालदार म्हणून काम करेल....
Nov 12, 2024, 17:50 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मेहकरात आज महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. संजय रायमुलकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अतिविराट जाहीर सभा पार पडली. ऐतिहासिक स्वातंत्र्य मैदानात झालेल्या या सभेने गर्दीचे आजवरचे उच्चांक मोडीत काढले.. ही सभा म्हणजे विजयाची नांदी आहे, आता फक्त लीड मोजा अशा प्रतिक्रिया सभेनंतर सामान्यजणांमधून उमटू लागल्या. दरम्यान या सभेत डॉ.संजय रायमुलकर यांचे भाषण नाही तेवढेच प्रभावी आणि दमदार झाले. आपल्या भाषणातून संजय रायमुलकर यांनी विरोधकांचे चांगलेच वाभाडे काढले. ज्यांनी आत्ता आत्ता प्रवेश केलाय ते आमच्यावर खालच्या पातळीवर टीका करतात.. ते आम्हाला निष्ठा शिकवतात अशा शब्दात आ. रायमुलकर यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. मी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन विकास कामे केली आहेत. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणी प्रमाणे आम्ही काम करतो आहोत. त्यामुळेच इथल्या जनतेचे भरभरून प्रेम मला मिळाले आहे.. जनतेचे एवढे प्रेम मिळवणारा मी भाग्यवान आमदार आहे असे म्हणत तुम्ही २० तारीख माझ्यासाठी द्या.. माझी पुढची ५ वर्षे तुमच्यासाठी आहेत..मी आमदार म्हणून नव्हे तर सालदार म्हणून काम करेल असे प्रतिपादन या सभेत आ.डॉ.संजय रायमुलकर यांनी केले. यावेळी सभेत होणारा टाळ्यांचा गजर सर्व काही सांगत होता...
यावेळी पुढे बोलतांना उपस्थित जनसमुदायाला उद्देशून आमदार डॉ.संजय रायमुलकर म्हणाले की, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला चौथ्यांदा उमेदवारी मिळाली. मी आमदार म्हणून काम करीत असताना स्वतःला कधी आमदार समजले नाही.तुम्हालाही मी आमदार वाटलो नाही. सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन गेल्या पंधरा वर्षापासून आपली सेवा करण्याची संधी मला मिळाली असे आ. रायमुलकर म्हणाले.
आधी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात घरात घुसून ऑनलाईन सरकार चालवणारा मुख्यमंत्री तुम्ही पाहिला आणि आता २४ तास जनतेच्या सेवेत काम करणारा मुख्यमंत्री तुम्ही पाहत आहात. आपल्या हिताचे निर्णय माहिती सरकारने घेतले आहेत असे आ.डॉ. रायमुलकर म्हणाले. यावेळी आमदार डॉ. रायमुलकर यांनी महायुती सरकारच्या लोकोपयोगी योजनांचा पाढा वाचला. शेतकऱ्यांसाठी अनेक हिताची निर्णय माहिती सरकारने घेतली आहेत. मेहकर विधानसभा मतदारसंघात देखील पेनटाकळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, नमो शेतकरी महासन्मान योजना यासह भावांतर योजना, सौर कृषी वाहिनी योजना यामुळे
शेतकरी वर्ग आता मोठ्या संख्येने महायुतीकडे वळतो आहे असे आ. रायमुलकर म्हणाले. काही लोक मतदारसंघात बाहेरून आली आहेत, त्यांना मतदारसंघाबद्दल काहीही माहिती नाही. त्यांना भाड्याने माणसे आणावी लागत आहेत असे आ. रायमुलकर म्हणाले. आम्ही २५ वर्षात जिवाभावाची माणसे जोडण्याचे काम केले आहे. त्यामुळे गावा गावांमध्ये जेव्हा मी प्रचार रॅली काढतो तेव्हा तिथली लोक मला म्हणतात की "ही प्रचार रॅली नाही तर विजयाची रॅली आहे" असे आ. रायमुलकर म्हणाले. आमदारकीच्या साडेबारा वर्षात जेवढी कामे करता आली नाहीत त्यापेक्षा दहापट कामे गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे करता आली असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी आशीर्वाद देण्याची विनंती आ. रायमुलकर यांनी केली.