

EXCLUSIVE बाकी काही असो.. खासदारांचा पगार वाढला हो! वाढत्या महागाईमुळे जगणे झाले होते मुश्किल! पहा तुमच्या खासदारांचा पगार किती? सुविधा काय मिळतात..दररोज भत्ता एवढा...
Mar 25, 2025, 14:22 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यासह देशात दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. सोयाबीन कापसाला भाव नाही..एवढेच काय तर देशभरातील शेतकरी परेशान आहे..मात्र काळजी करण्याचे कारण नाही...आपल्या लाडक्या खासदारांचा पगार आता सरकारने वाढवला आहे. त्यामुळे देशभरातील बहुतांश समस्या मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.. अत्यल्प पगारामध्ये खासदारांना आपल्या संसाराचा गाडा ओढावा लागत होता..वाढत्या महागाईमुळे जगणे मुश्किल झाले होते, त्यामुळे आता सरकारने खासदारांचा पगार वाढवण्याचे निश्चित केल्याच्या प्रतिक्रिया मायबाप जनतेतून उमटत आहेत..तर ऐका.. खासदारांच्या पगारात २४ टक्के वाढ करण्यात आली आहे. याशिवाय भत्ते आणि माजी खासदारांच्या निवृत्तीवेतनात देखील वाढ करण्यात आली आहे.
संसदीय कामकाज मंत्रालयाने सोमवारी यासंदर्भातील अध्यादेश जारी केला. महागाई निर्देशांका नुसार खासदारांचे वेतन ,भत्ते व पेन्शन मध्ये वाढ करण्यात आली आहे. खासदारांना आधी एक लाख पगार मिळत होता. आता ही वाढ १ लाख २४ हजार एवढी झाली आहे. याशिवाय खासदारांचा दैनंदिन भत्ता आधी २ हजार रुपये होता तो आता अडीच हजार एवढा करण्या आला आहे.
या मिळतात सुविधा..
खासदारांना पगारा व्यतिरिक्त इतरही सुविधा मिळतात. खासदारांना राजधानी दिल्लीत शासकीय घर मिळते. याशिवाय मतदारसंघ भत्ता म्हणून खासदारांना दरमहा ७० हजार रुपये मिळत होते,आता दरमहा ८७ हजार मिळणार आहे. कार्यालय भत्ता म्हणून ६० हजार मिळत होते आता ७५ हजार रुपये मिळणार आहेत. प्रत्येक खासदाराला मतदारसंघ ते दिल्ली दरम्यान ३४ वेळा विमान प्रवास मोफत आहे. रेल्वेच्या प्रथम वातानुकूलित डब्यात मोफत प्रवासाची सवलत खासदारांना असते. दिल्लीच्या घरात ५० हजार युनिट मोफत आणि ४ लाख लिटर पाणी मोफत वापरता येते..