EXCLUSIVE स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी चा कार्यक्रम पुढे ढकलला! राज्य निवडणूक आयोगाचे नवे आदेश; निवडणुकीची घोषणा लांबणार! ... तर फेब्रुवारीनंतर निवडणुका?

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची उत्सुकता सगळीकडेच लागली आहे..मात्र ही उत्सुकता ताणत असतानाच राज्य निवडणूक आयोगाने आज दिलेल्या आदेशात अंतिम मतदार यादीच्या प्रसिद्धीची तारीख समोर ढकलली आहे. नियोजित कार्यक्रमानुसार आज,२७ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होणार होती,मात्र आता ३ नोव्हेंबर पर्यंत यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
 त्रुटी असलेली अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येऊ नये अशी एक याचिका दोन दिवसांपूर्वी उच्च न्यायालयात दाखल झाली होती. १ जुलै नंतर नोंदणी झालेल्यांची नावे मतदार यादीत पुरवणी यादी म्हणून समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी याचिका कर्त्यांनी केलेली होती. त्याबद्दल अंतिम निर्णय झालेला नसताना राज्य निवडणूक आयोगाने मात्र अंतिम यादी प्रसिद्ध करण्याची तारीख वाढवली आहे. १२ नोव्हेंबरला मतदारांची केंद्रनिहाय यादी प्रकाशित होणार आहे त्यानंतरच निवडणुकीच्या घोषणेचा विचार होऊ शकतो अशी शक्यता आहे...
मतदार यादी गोठवल्याचे प्रकरण न्यायालयात..
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै रोजी मतदार यादी गोठवली. याचा आदेश २१ ऑगस्ट रोजी राज्य निवडणूक आयोगाने दिला. मात्र त्याआधी मतदार यादी गोठवल्याची पूर्व सूचना न दिल्याने १ जुलै नंतर मतदान यादीत नोंदणी करणारे नवमतदार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून वंचित राहणार असल्याची भीती निर्माण झाली आहे. आता १ जुलै उलटून जवळपास ४ महिने होत आलेले असल्याने १ जुलै नंतरचे मतदार पुरवणी यादीच्या स्वरूपात जोडावे लागू शकतात.३१ ऑक्टोबरला याबाबत सुनावणी होण्याची शक्यता आहे..
  तर निवडणुका फेब्रुवारीनंतर?
दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने आज १२ राज्यांमध्ये मतदार याद्यांच्या सघन पुनर्नरीक्षणाचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. महाराष्ट्राचा यामध्ये समावेश नाही..मात्र महाराष्ट्रात देखील एसआयआर लागू करून दुरुस्त झालेल्या मतदार याद्यांच्या आधारेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांमधून समोर येत आहे.. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात देखील जाण्याची तयारी काहींनी दर्शवली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील मतदार याद्यांचे सघन परीक्षण झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ७ फेब्रुवारी नंतरच होऊ शकतील...