EXCLUSIVE केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी सांगितले केसगळतीचे कारण! म्हणाले, गव्हामुळे झाला असता तर.....
Feb 26, 2025, 17:12 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील १४ गावांमध्ये २७९ व्यक्तींमध्ये अति वेगाने केसगळती झाली होती. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यसह देशभराचे लक्ष वेधून घेतले होते. यासंदर्भात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने तीन दिवस गांवात राहून भाितांच्या २५० नमुन्यांची तपासणी केली होती. मात्र महिनाभरापेक्षा अधिक कालावधी उलटून सुद्धा याचा केसगळती मूळ कारणांचा उलगडा झालेला नव्हता. दरम्यान काही दिवसाआधी पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ . हिम्मतराव बावस्कर यांनी स्वतः गावाला भेट देत बाधित रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासले. त्यांच्या चाचण्यांमध्ये लोकांच्या शरीरात सेलेनियमचे प्रमाण जास्त झाल्याने आणि झिंकचे प्रमाण कमी झाल्याने केस गळती होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. दरम्यान आज, बुलढाण्यात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनीदेखील सेलेनियमचे प्रमाण जास्त असल्याने केसगळती होत असल्याचा आयसीएमआर चा प्राथमिक अहवाल असल्याचे सांगितले.. मात्र अद्याप अंतिम अहवाल यायचा आहे असेही केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव म्हणाले. राशनच्या गव्हामध्ये सेलेनियम चे प्रमाण अधिक असल्याने त्यामुळे केस गळती होत असावी अशा चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या, मात्र केवळ गव्हामुळे केस गळती होते असे नाही असेही ना.प्रतापराव जाधव म्हणाले.
"भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद" म्हणजे काही खाजगी कंपनी नाही. शास्त्रज्ञ त्यावर रिसर्च करीत आहेत. सिलेनियम चे प्रमाण जास्त असल्याने केस गळती होत असल्याचा प्राथमिक अहवाल असला तरी त्यावर आणखी संशोधन सुरू असल्याचे ना.प्रतापराव जाधव म्हणाले. गव्हामुळे केस गळती होत असल्याचे तर्क वितर्क वर्तवण्यात येत आहेत यावर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, "आयसीएमआर" ने या गावातील गव्हाची देखील तपासणी केली आहे. एकूण तीन राशन दुकानांमधील गव्हाचे नमुने तपासले. मात्र प्रत्येक नमुने वेगळे आहेत. एका नमुन्यात सेलेनियम चे प्रमाण अधिक आढळले, दुसऱ्या नमुन्यात कमी तर तिसऱ्या नमुन्यात ते नसल्यात जमा होते. शिवाय गव्हामुळेच केस गळती झाली असती तर ती संपूर्ण जिल्ह्यात झाली असती. कारण सगळीकडे तसा प्रकार झाला असता, कारण त्या १४ गावांना जिथून गव्हाचा पुरवठा होतो तिथूनच जिल्ह्यातील सगळीकडे तो गहू जातो. त्यामुळे गव्हामुळे केस गळती झाली असा निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. या गावांमधील लोकांच्या खाद्यपदार्थांमध्ये सेलेनियम कुठून येते याचा शोध घेण्यात येत असल्याचे ते म्हणाले..