EXCLUSIVE आ.संजय गायकवाड यांचे विधान शशिकांत खेडेकरांसाठी अडचणीचे...? वाचा काय आहे प्रकरण.... नगराध्यक्ष पदावरून आ.गायकवाड यांचे विधान...

 
 बुलडाणा(अक्षय थिगळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. आधी जिल्हा परिषद की नगरपालिका याबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे. या निवडणुकांमध्ये महायुती होईल की सगळे पक्ष स्वतंत्र लढतील याबाबत तर्कवितर्क लढवण्यात येत आहे.. बुलढाणा जिल्हापुरते बोलायचे झाल्यास महाविकास आघाडी एकत्रित लढण्याची शक्यता अधिक आहे.. दुसरीकडे महायुतीत काय होते? याकडे कार्यकर्त्यांसह सगळ्यांच्याच नजरा लागून आहेत. शिवसेनेकडून ना.प्रतापराव जाधव , जिल्हा संघटक तथा आमदार संजय गायकवाड यांनी वेळोवेळी युती गरजेची असल्याचे सांगितले आहे. आ. श्वेताताई महाले यांच्यासह भाजपच्या वर्तुळातूनही  युतीचे संकेत मिळत आहेत..दरम्यान सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्याकडून त्यांच्या सुनेला देऊळगाव राजाच्या नगराध्यक्ष पदासाठी प्रमोट केले जात आहे..त्यासाठी गतकाळात विविध कार्यक्रमांचे आयोजनही झाले, बॅनरवरही त्या झळकत आहेत..मात्र आता त्यांच्यासाठी शिवसेनेचे जिल्हा संघटक असलेले आमदार गायकवाड यांचे एक विधान अडचणीचे ठरण्याची चिन्हे आहेत...

आ.संजय गायकवाड यांनी वेळोवेळी युतीची आवश्यकता अधोरेखित केली आहे. कार्यकर्त्यांच्या निवडणुकात युती होणे गरजेचे आहे, कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही असे आ.गायकवाड यांनी म्हटले आहे. शिवाय युतीच्या सूत्रावर बोलताना "ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार तिथे त्या पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार." असेही स्पष्ट केले.  आ.गायकवाड यांनी म्हटल्याप्रमाणे जर महायुती झालीच तर देऊळगाव राजाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस दावा  करू शकते, कारण सध्या तिथे मनोज कायंदे यांच्या रूपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यामुळे जिथे ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हे विधान माजी आ. शशिकांत खेडेकर यांच्यासाठी अडचणीचे ठरू शकते..कुणी एक पाऊल मागे घेतले नाही तर तिथे विधानसभा निवडणुकीप्रमाणे मैत्रीपूर्ण लढतही होऊ शकते..