EXCLUSIVE आमदार गायकवाडांचे चिखलीवर लक्ष! बहाणा विधानसभेचा,टार्गेट लोकसभा? गुरु–शिष्याच्या नात्यामध्ये का पडलाय दुरावा !
Mar 2, 2026, 11:45 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड सातत्याने चर्चेत असतात. ही चर्चा केवळ जिल्ह्या –पुरती मर्यादित नसते तर राज्यपातळीवरही बऱ्याचदा ते आपल्या विधानांनी चर्चेत असतात. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा मिळवलेला विजय, बुलढाणा नगरपालिकेवर एक हाती वर्चस्व यामुळे आ.गायकवाड यांचे शिवसेनेच्या संघटनेत चांगलेच वजन वाढले आहे. महायुती म्हणून शिवसेना राज्यपातळीवर सत्तेत भाजपसोबत असले तरी आ. गायकवाडांचे बुलढाण्याच्या भाजप नेतृत्वाशी जमत नाही. मात्र आपला वाद हा भाजपशी नसून भाजप मधल्या उपऱ्या लोकांशी आहे असं आ.गायकवाड नेहमी सांगत असतात. आ.गायकवाड प्रचंड राजकीय महत्त्वकांक्षी आहेत ही बाब लपून राहिलेली नाही. लोकसभा निवडणुकीत प्रतापरावांच्या आधीच भरलेला उमेदवारी अर्ज, चिखली विधानसभेत कुणाल गायकवाड यांचा भरलेला उमेदवारी अर्ज या बाबी चांगल्याच गाजल्या होत्या. २०१९ ला विजयराज शिंदे यांचे तिकीट कापून प्रतापराव जाधव यांनी आपल्या बेडरूम मध्येच भल्या पहाटे संजय गायकवाड यांना एबी फॉर्म दिला होता, आणि गायकवाडांच्या विजयाची जबाबदारी स्वतः घेत निवडणून देखील आणले होते. आमदारकीच्या पहिल्या अडीच वर्षात प्रतापराव जाधव हे आपले राजकीय गुरु असल्याचे आ. गायकवाड सांगत होते, बुलढाण्यात घेतलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी "प्रतापरावांची" गुरुपूजा देखील केली होती. मात्र शिवसेनेत शिंदे राज सुरू झाल्यानंतर मात्र आ. गायकवाडांच्या राजकीय महत्त्वकांक्षेला धुमारे फुटू लागले आहेत. आ. गायकवाडांच्या या महत्वकांक्षेमुळे जिल्ह्याच्या शिवसेनेत देखील दोन गट पडले आहेत.. एक गट आहे ना. प्रतापराव जाधवांचा तर दुसरा आ. संजय गायकवाड यांचा! एकेकाळी गुरु-शिष्यांचे नाते असलेल्या या दोन नेत्यांमध्ये आता कमालीचा बेबनाव झाला आहे. एवढा की प्रतापगडाला हादरे देण्याची एकही संधी आ.गायकवाड सोडतांना दिसत नाही. आ. गायकवाड यांच्याकडून सुरू असलेल्या चिखली विधानसभेच्या कॅम्पेनिंगचा देखील हाच हेतू आहे का?
नगरपालिका निवडणुकांच्या आधीपासून आ. गायकवाडांनी चिखलीच्या राजकारणात लक्ष देणे सुरू केले आहे. चिखली नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी चिखलीत शिवसैनिकांची बैठकही घेतली होती, त्या बैठकीचा चांगलाच गाजावाजा विविध माध्यमांतून करण्यात आला होता. मात्र ना. जाधव यांना या बैठकीचे निमंत्रणही नव्हते आणि त्यांचा फोटोही बॅनर वर नव्हता. त्यामुळेच ना. प्रतापराव जाधव यांचा गट या बैठकीला हजर नव्हता. दोन नेत्यांमध्ये बिनसलेले असल्याने शिवसेना नेतृत्वाने देखील नगरपालिका निवडणुकांची जबाबदारी कुणा एकावर न देता दोघांवर दिली.. वादाचा परिणाम व्हायचा तोच झाला, वैशाली खेडेकरांची एक जागा वगळता चिखलीत शिवसेनेला काही जमले नाही. त्यानंतर आता पुन्हा आ. गायकवाड यांच्याकडून चिखली विधानसभेत भेटीगाठी वाढवल्या आहेत. कुणाल गायकवाड चिखली विधानसभेतील विविध गावांना भेटी देत आहेत, अधूनमधून आ. गायकवाड देखील चिखली विधानसभेत दिसत असतात.
बहाना विधानसभा टार्गेट लोकसभा?
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी आ.गायकवाड यांनी प्रतापराव जाधव यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्याचवेळी वेळोवेळी वेगवेगळी विधाने करून प्रतापराव जाधव यांच्याबद्दलची नाराजी आ. गायकवाड यांनी उघडपणे व्यक्त केली होती. त्यासाठी स्वतः प्रतापराव जाधव यांना आमदार गायकवाड यांच्या कार्यालयात जावे लागले होते. विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील प्रतापरावांनी आपले काम केले नसल्याचे आ.गायकवाड यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले होते. बुलढाण्यात विजयराज शिंदेंनी अर्ज भरल्यानंतर त्यांनी पुत्र कुणाल गायकवाड यांना देखील चिखलीत अर्ज भरायला लावला होता.
अखेर भाजप नेतृत्वाने शिंदे यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावल्यानंतरच कुणाल गायकवाड यांनी माघार घेतली होती. मात्र आता पुढील लोकसभा निवडणुका ३ वर्षे दूर राहिलेल्या असतानाच आ. गायकवाड यांच्या कडून पेरणी सुरू झाली आहे.
पक्षांतर्गत युद्ध आतापासूनच जास्त भडकू नये म्हणून दाखवायचे विधानसभा आणि प्रत्यक्ष टार्गेट लोकसभा? असा तर उद्देश आ. गायकवाड यांचा नाही ना? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. संपर्कप्रमुख या नात्याने संघटनेत दबदबा निर्माण करायचा, संघटना हाताशी धरून मिळाली तर लोकसभा नाहीतर जवळची चिखली विधानसभा आहेच की..आणि आता तुम्ही म्हणाल चिखली विधानसभेसाठी उमेदवार कोण? हा प्रश्न आ.गायकवाडांना कधीच पडत नाही.. नगरपालिका निवडणुकीत बुलडाणेकरांनी बघितलंच..