EXCLUSIVE निष्ठा गेली उडत! शेवटच्या दिवशी पलटूरामांची संख्या वाढली! काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यावर निलेश गावंडे काही मिनिटांत राष्ट्रवादीत गेले!

काँग्रेसचे वाधवानी भाजपात गेले; बुलढाण्यात काँग्रेसचे सुनील सपकाळ उबाठात गेले.... 
 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय... उडत गेली उडत गेली पक्षनिष्ठ आता उडत गेली, असंच म्हणण्याची वेळ अनेकांवर आली आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पक्ष नेतृत्वाने अनेकांचे तिकीट कापले, पुढच्याच क्षणी ज्यांचे तिकीट कापले ते दुसऱ्या पक्षात गेले अन् उमेदवारी ही मिळवली. त्यामुळे कोणता माणूस कोणत्या पक्षात हे समजायला मार्ग नाही. महायुती , महाविकास आघाडी असं काहीही चित्र नाही.. कुणीही कुणाच्या विरोधात उभे आहे... एकंदरीत बहुरंगी लढती होतील असेच चित्र निर्माण झाले आहे. शेवटच्या दिवशी पलटूरामांची संख्या झपाट्याने वाढली आहे..

चिखलीत काँग्रेसचे अमित वाधवानी  भाजपात गेले आहेत. प्राध्यापक निलेश गावंडे काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार होते, मात्र त्यांच्याऐवजी बोंद्रे घराण्यातीलच उमेदवारी द्यायची हे निश्चित झाल्याने निलेश गावंडे यांनी अखेरच्या क्षणी पलटी मारली. थेट महाविकास आघाडीतून ते सत्ताधारी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले आणि तिथून उमेदवारी देखील मिळवली. वृत्त लिहिस्तोवर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नव्हता..मात्र त्या दृष्टीने तयारी सुरू होती, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नगरपालिकेत दाखल झाले होते. दुसरीकडे बुलढाण्यातील काँग्रेसचे सुनील सपकाळ यांनी उबाठाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चिखलीत भाजपकडून पंडितराव देशमुख यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र त्यांनी वेगळे पाऊल उचललेले नाही. चिखलीत काही आजी माजी नगरसेवकांनी देखील तिकीट काढल्यानंतर वेगवेगळ्या पक्षात उड्या मारले आहेत.. एकंदरीत संपूर्ण जिल्हाभर आज तेच चित्र आहे... पलटूरामांची संख्या झपाट्याने वाढल्याने "निष्ठा गेली उडत" असेच एकंदरीत चित्र आहे..