EXCLUSIVE डॉ.राजेंद्र शिंगणेंना रुतले घड्याळाचे काटे! विधानसभेच्या रिंगणात पहिल्यांदा पराभव; ज्या घड्याळीवर चारदा जिंकले, त्या घड्याळीनेच चारली पराभवाची धूळ....
Nov 23, 2024, 20:35 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्राम यावेळी चांगलाच चुरशीचा ठरला. महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होऊन देखील महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मनोज कायंदे विजयी झाले.. लोकसभेत दोनदा पराभव पाहिलेल्या डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी त्यांची राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदा पराभव पाहिला आहे..योगायोग म्हणजे याआधी डॉ.शिंगणे यांनी ५ वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले, त्यापैकी १९९९ पासून ४ वेळा ते घड्याळ या चिन्हावर निवडणूक जिंकले..यावेळी मात्र शेवटच्याक्षणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत उडी मारल्याने त्यांना "तुतारी फुंकणारा माणूस" या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली..आणि ४ वेळा ज्या घड्याळीने विधानसभेची दारे उघडली त्या घड्याळीचे काटे यावेळी डॉ.शिंगणे यांना चांगलेच रुतले..
२०१४ च्या निवडणुकीचा अपवाद वगळता (कारण ती निवडणूक डॉ.शिंगणे यांनी लढली नाही) १९९५ पासून सिंदखेड राजा या मतदारसंघावर डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा एक छत्री अंमल राहिला. जेव्हा जेव्हा सत्ता मिळाली तेव्हा तेव्हा त्यांना मंत्रीपदही मिळाले. मात्र २५ वर्षे एवढी प्रदीर्घकाळ सत्ता मिळाली असताना देखील डॉ.शिंगणे यांना विकासकामे करण्यात फारसे यश मिळाले नाही हेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. त्या तुलनेत चिखली आणि बुलडाणा विधानसभा मतदारसंघात नवख्या आमदारांनी मतदारसंघाचे रुपडे पालटून दाखवले. या निवडणुकीत डॉ.शिंगणे यांना पहिल्यांदा एवढी प्रचंड धडपड करावी लागली. विकासाच्या मुद्द्यावरून त्यांना विरोधकांनी घेरले, त्या मुद्यावर डॉ.शिंगणे विरोधकांना उत्तर देण्यात कमी पडले. शिवाय राज्यात महाविकास आघाडीची लाट आहे असा भ्रम डॉ.शिंगणे यांना झाला आणि त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत उडी मारली, ती देखील डॉ.शिंगणे यांची मोठी चूक ठरल्याचे आज निकालाअंती दिसून आले आहे.
अंदाज फोल ठरला..
महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत होती..त्यामुळे महायुतीत मत विभाजन होऊन त्याचा फायदा आपल्यालाच होईल हा भ्रम डॉ.शिंगणे यांना व त्यांच्या समर्थकांना झाला. जेव्हा मनोज कायंदे यांची उमेदवारी घोषित झाली त्यानंतर डॉ.शिंगणे समर्थक यांना विजयाची केवळ औपचारिकता बाकी आहे असे वाटत होते. त्यामुळे ज्या गतीने प्रचारात झोकून द्यायला हवे होते त्या गतीने डॉ.शिंगणे यांच्याकडून प्रचार झाला नाही.त्या तुलनेत कमी अनुभवी असलेले मनोज कायंदे मात्र डॉ.शिंगणे आणि डॉ.खेडेकर या अनुभवी नेत्यांना सर्वच बाबतीत पुरून उरले. मनोज कायंदे यांच्या बाबतीत डॉ.शिंगणे यांचे सर्वच अंदाज फोल ठरले..त्यामुळे "काटा रुते कुणाला?" या बुलडाणा लाइव्ह ने प्रचार कालावधीत केलेल्या सवालाचे उत्तर आता मिळाले असून ते काटे डॉ.शिंगणे यांना जरा जास्तच रुतल्याचे आता दिसत आहे...