EXCLUSIVE माजी आमदार दिलीकुमार सानंदांनी काँग्रेस सोडलीच? पक्षप्रवेशाचा मुहूर्तही ठरला...कोणत्या पक्षात प्रवेश? तारीख वाचा बातमीत...
May 2, 2025, 09:52 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "जब तक जिंदा हू काँग्रेस का परिंदा हु..." असे म्हणणाऱ्या माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त निश्चित झालाय. शरीराने काँग्रेसमध्ये दिसत असले तरी सानंदा यांनी मनाने काँग्रेस सोडलीच आहे. काल, माजी आ.सानंदा यांचा काल,१ मे रोजी वाढदिवस होता..या वाढदिवसाच्या निमित्ताने वर्तमानात्रात छापून आलेल्या जाहिराती, खामगाव शहरात लागलेले बॅनर सर्व काही सांगत होते.. राणा फाउंडेशनच्या वतीने खामगाव जिल्हा झाला पाहिजे यासाठी काल, धरणे आंदोलन करण्यात आले. यासाठी तयार करण्यात आलेल्या बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार , भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांचे फोटो होते. त्यामुळे सानंदा यांनी कांग्रेस सोडल्याच्या वृत्तावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.
२०१४ च्या आधी खामगाव च्या राजकारणात दिलीप कुमार सानंदा यांचा दबदबा होता. स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्यासारखे भाजपचे दमदार नेतृत्व असताना देखील १९९९, २००४ आणि २००९ अशा सलग तीन निवडणुकांत सानंदा यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली. माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख आणि सानंदा यांचे जवळचे संबंध होते.मात्र विलासरावांच्या निधनानंतर सानंदा यांना गॉडफादर मिळाला नाही.२०१४ च्या निवडणुकीत मोदींच्या प्रभावात आकाश फुंडकर आमदार झाले. २०१९ ला स्वतः सानंदा यांनी माघार घेत ज्ञानेश्वर पाटलांना पुढे केले. त्याही निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. २०१९ ते २०२४ या काळात काँग्रेसमध्ये देखील सानंदा एकाकी पडल्यासारखे वाटत होते. स्वतःची उमेदवारी बाजूला ठेवून ज्या ज्ञानेश्वर पाटलांच्या गळ्यात सानंदा यांनी उमेदवारीची माळ टाकली ते ज्ञानेश्वर पाटीलच सानंदा यांचे पक्षांतर्गत विरोधक बनले. एवढे की २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी सानंदा यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. उमेदवारी मिळाली तरी पक्षांतर्गत कलह आणि काँग्रेसचे कमी झालेले संघटन याचा फटका सानंदा यांना बसला आणि त्यांचा पराभव झाला. आता पुढची ५ वर्षे पुन्हा विरोधात राहणे सानंदा यांच्यासारख्या व्यावसायिक राजकारणी व्यक्तीला परवडणारे नाही. त्यामुळेच सानंदा यांनी काँग्रेस सोडण्याचे जवळजवळ निश्चित केल्याचे समजते. काल, सानंदा यांच्या राणा फाउंडेशन च्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातींमधून महाविकास आघाडीचे सर्वच नेते गायब होते. याशिवाय त्यावर महायुतीच्या नेत्यांची एन्ट्री झालेली होती..हे सानंदा यांनी काँग्रेस सोडल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
ना.फुंडकरांचा पक्षप्रवेशाला विरोध?
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीपकुमार सानंदा यांनी महायुतीतील कुठल्याही पक्षात जाण्याची तयारी दर्शवली होती. मात्र सानंदा यांना भाजपमध्ये घेण्यास ना.आकाश फुंडकर यांचा स्पष्ट विरोध होता. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी दोन ते तीन वेळा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती. गेल्या आठवड्यात देखील आ.गायकवाड यांच्या फार्म हाऊस वर सानंदा यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दरम्यान भाजप आणि शिंदेसेनेत सानंदा यांचा प्रवेश होऊ नये म्हणून ना.फुंडकर यांनी दबाव वाढवला. त्यामुळे सानंदा यांनी आता आपला मोर्चा अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळवला असल्याचे सांगण्यात येत आहे. पक्ष संघटना वाढीसाठी महत्त्व देणारे अजित पवार ना.फुंडकर यांच्या दबावाला बळी पडण्याची शक्यता कमी आहे. शिवाय सानंदा यांच्या प्रवेशामुळे बुलडाणा जिल्ह्यात अजित पवार गटाला दमदार नेतृत्व मिळेल त्यामुळे अजित पवार यांच्याकडून सानंदा यांना ग्रीन सिग्नल मिळाल्याचे वृत्त आहे. सानंदा यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अर्थातच महायुतीत प्रवेश झाल्यानंतर ना. फुंडकर यांच्या विरोधाची तीव्रता कमी होईल, हेच सानंदा यांना हवे आहे. त्यामुळे ४ मे रोजी किंवा त्यानंतर कोणत्याही क्षणी दिलीपकुमार सानंदा यांचा पक्षप्रवेश होऊ शकतो.. पण हे राजकारण आहे भाऊ, यात कोणत्याही क्षणी बदलही होऊ शकतो...