बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडी अतिशय वेगाने घडत आहेत. डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी तुतारी फुंकल्यानंतर आता महायुतीकडील इच्छुकांच्या महत्त्वकांक्षा बळवल्या आहेत. युतीत ठरलेल्या जागा वाटपाच्या सूत्रानुसार सिंदखेड राजाच्या जागेवर पहिला अधिकार अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचा आहे,मात्र डॉ. राजेंद्र शिंगणे यांना टक्कर देऊ शकेल असा प्रबळ उमेदवार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाही..काहीही करून "तुतारी"चा पराभव "घड्याळी" ने करावा या जिद्दीला अजित पवार पेटले असल्याने प्रसंगी "उमेदवार तुमचा पण चिन्ह आमचे" असा तोडगा या जागे संदर्भात निघण्याची दाट शक्यता आहे.
डॉ.राजेंद्र शिंगणे हे महाविकास आघाडीचे उमेदवार राहतील हे आता एक हजार एक टक्के निश्चित आहे. विधानसभा निवडणुकीत गुलाल कसा उधळायचा या बाबतीत डॉ.शिंगणे यांचा गाढा अभ्यास आहे. त्यामुळे शिंगणे यांना टक्कर देण्यासाठी तुल्यबळ उमेदवार महायुतीला द्यावा लागणार आहे.
अजित पवार गट सिंदखेड राजाची जागा ताकदीने लढवणार असल्याचे विधान करून एकप्रकारे स्वतःच्या उमेदवारीची दावेदारी ॲड. नाझेर काझी यांनी केली असली तरी त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. अशा परिस्थितीत भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेतील इच्छुकांच्या महत्त्वकांक्षा प्रचंड वाढल्या आहेत. माजी आ.डॉ.शशिकांत खेडेकर, योगेश जाधव, भाजपकडून डॉ.सुनील कायंदे इच्छुक आहेत. विनोद वाघ आणि डॉ. गणेश मांटे यांनी देखील निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.त्यामुळे या इच्छुकांपैकी एकाच्या मनगटावर घड्याळ बांधले जाण्याची शक्यता आहे..
तर घड्याळाविना निवडणूक...
सिंदखेड राजा मतदार संघ आणि घड्याळ हे समीकरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आहे. १९९९ पासून झालेल्या ५ निवडणुकांत घड्याळ हे चिन्ह घराघरात पोहचले आहे. २०१४ च्या निवडणुकीचा अपवाद वगळता (तेव्हा डॉ शिंगणे मैदानात नव्हते) ४ निवडणुका घड्याळीने जिंकल्या आहेत. मात्र यावेळेला मोठा पेच निर्माण झाला आहे. "उमेदवार तुमचा पण चिन्ह आमचे" यावर महायुतीत एकमत झाल्यास पुन्हा एकदा सहाव्यांदा घड्याळ रिंगणात असेल..मात्र त्यावर तोडगा न निघाल्यास घड्याळीविना ही निवडणूक लढल्या जाऊ शकते...