EXCLUSIVE ॲड. नाझेर काझी, अभय चव्हाण, इरफान अली, संतोष खांडेभऱ्हाड,देविदास ठाकरे हे कार्यकर्ते कुणाचे? डॉ. शिंगणेंना मदत करण्यासाठी ते राष्ट्रवादीत थांबले!

सिंदखेडराजात महायुतीच्या कार्यकर्त्याचे सोशल पत्र व्हायरल!शिवसेना-भाजपा नैसर्गिक महायुतीला धोक्यात आणण्याचा कुटील डाव हाणून पाडण्याचे आवाहन....

 
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे. ऐन शेवटच्या क्षणी काँग्रेस मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आलेल्या मनोज कायंदे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडल्याने इथे चांगलाच गुत्ता निर्माण झाला आहे. दरम्यान आता या प्रकरणाला धरूनच सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात एक पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे."शिवसेना-भाजपा महायुतीचा सच्चा कार्यकर्ता " या नावाने हे पत्र व्हायरल होत असून त्यात शिवसेना भाजपा या नैसर्गिक माहितीला डोक्यात आणण्याचा कुटील डाव हाणून पाडा असे आवाहन करण्यात आले आहे. याच पत्रात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह देखील निर्माण करण्यात आले असून डॉ.राजेंद्र शिंगणे यांना मदत करण्यासाठीच त्यांचे समर्थक अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहिल्याचे या व्हायरल पत्रात नमूद आहे...या व्हायरल पत्राने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे..

 महायुतीमध्ये शिवसेनेचे उमेदवार डॉ.शशिकांत खेडेकर मागील २० -२५ वर्षांत भाजप शिवसेना युतीमध्ये प्रामाणिक काम करत आहेत. त्यांनी देऊळगाव राजा, सिंदखेडराजा नगरपरिषद मध्ये भाजप शिवसेनेची सत्ता आणली मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीने सतत काँग्रेसमध्ये कार्यरत असणारे व भाजप-शिवसेना युतीच्या सतत विरोधात काम करणारा उमेदवार आयात करून राष्ट्रवादीची उमेदवारी दिली हे कितपत योग्य आहे? असा सवाल या व्हायरल पत्रात करण्यात आला आहे. हा भाजप शिवसेना युतीमध्ये काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय आहे असेही या पत्रात म्हटले आहे. केवळ तिकिटासाठी आयात उमेदवाराने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
आज सिंदखेडराजा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे अस्तित्व काय राहिले याची सर्वांना कल्पना आहे, मग तरीही राष्ट्रवादीच्या तिकिटासाठी एवढा अट्टाहास का? याचे उत्तर म्हणजे केवळ डॉ. राजेंद्र शिंगणे यांना मदत करण्यासाठीच त्यांचे समर्थक राष्ट्रवादीमध्ये राहिले. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला समर्थन देणारे ॲड. नाझेर काझी, अभय चव्हाण इरफान अली संतोष खांडेभराड देवीदास ठाकरे हे कार्यकर्ते कुणाचे? केवळ भाजपच्या मतांवर डोळा ठेवून शिवसेना उमेदवाराची मते कमी करण्यासाठी, त्यांची मते खाण्यासाठी हे कुटिल कारस्थान करण्यात आल्याचे जनतेच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही असा दावाही या व्हायरल पत्रात करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून तर येणारच नाही परंतु पडल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांच्या किती कामे पडणार हा चिंतनाचा विषय आहे, असेही या पत्रात नमूद आहे.