ElectionSpecial उरली सूरली इज्जत वाचवण्याचे बुलढाण्यात काँग्रेस समोर आव्हान! वाचवतील का काँग्रेसवाले प्रदेशाध्यक्षांची इज्जत?
बुलडाणा नगरपरिषदेत एकीकडे आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजाताई गायकवाड, दुसरीकडे भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या पत्नी अर्पिताताई शिंदे यांच्यासमोर महाविकास आघाडी कडून लक्ष्मी दत्ता काकस यांना नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरवण्यात आले आहे. बुलढाण्यात महायुतीत फूट तर महाविकास आघाडी एकजूट असे वरवर चित्र दिसत असले तरी महाविकास आघाडीच्या आतल्या गोटात मात्र अशांतता आहे.
आधी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात वंचित बहुजन आघाडी कडूनही बुलढाण्यात नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल करण्यात आली होती. मात्र वंचितच्या उमेदवार अर्चना हिरोळे यांनी उमेदवारी मागे घेतल्याने काँग्रेसला दिलासा मिळाला असला तरी वंचित समर्थकांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे.
मागे घेण्यासाठी उमेदवारी दिली होती? असा सवाल कार्यकर्त्यांकडून उपस्थित केल्या जात आहे. शिवाय ढिसाळ प्रचार यंत्रणा आणि तिन पक्षांमधील समन्वयाचा अभाव याचा फटका काँग्रेसला बसू शकतो. बुलढाण्यात विकास झालाच नाही हा महाविकास आघाडीचा दावाच नागरिकांमध्ये हास्यास्पद ठरतो आहे..
ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेस लोकांमध्ये जातांना दिसत असल्याने फारसा सकारात्मक प्रतिसाद बुलढाण्यात मिळताना दिसत नाही. बुलढाण्यात काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला तर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर ती मोठी नामुष्की असेल. त्यामुळे आपल्या माणसाची इज्जत वाचवण्याची जबाबदारी आता काँग्रेसच्या पुढार्यांपुढे आहे..मात्र काँग्रेसमध्ये पुढारी म्हणून मिरवणारे जास्त आणि काम करणारे कमी अशी एकंदरीत स्थिती असल्याने चित्र काँग्रेससाठी काही चांगले नाही...
