ELECTION SPECIAL महायुतीकडून जिल्ह्यातील ७ पैकी ५ जागा डिक्लेअर! सिंदखेराजा अन् मलकापूरची घोषणा बाकी! महाविकास आघाडीचे अजूनही ठरेना.....

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात महायुतीने ७ पैकी ५ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार घोषित करून आघाडी घेतली आहे. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी कडून मात्र एकाही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. महायुतीने चिखलीतून आ. श्वेताताई महाले, खामगाव मधून आकाश फुंडकर, जळगाव जामोद मधून डॉ. संजय कुटे, बुलढाणा येथून संजय गायकवाड तर मेहकर मधून पुन्हा एकदा डॉ. संजय रायमुलकर या जुन्याच चेहऱ्यांना संधी दिली आहे. आता महायुतीकडून केवळ सिंदखेडराजा आणि मलकापूर मतदार संघाच्या उमेदवारीची घोषणा बाकी आहे..

बुलडाणा जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघापैकी महायुतीत भाजपला चिखली, खामगाव, जळगाव जामोद आणि मलकापूर अशा ४ जागा जात आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटाला बुलडाणा आणि मेहकर या दोन जागा देण्यात आल्या आहेत.डॉ.राजेंद्र शिंगणे शरद पवार गटात गेल्याने सिंदखेडराजाच्या जागेवरून पेच निर्माण झाला आहे.

 

 

 सिंदखेडराजाची एकमेव जागा अजित पवारांच्या गटाकडे असल्याने अजित पवार सिंदखेडराजावरील दावा सोडायला तयार नाहीत..मात्र अजित पवारांकडे प्रबळ उमेदवार नसल्याने "उमेदवार तुमचा पण चिन्ह आमचे" या तोडग्यावर सिंदखेडराजा अजित पवार गटाकडे कायम राहू शकते. अशा स्थितीत शिंदेंच्या शिवसेनेकडील इच्छुकांना किंवा भाजपच्या इच्छुकांना मनगटावर घड्याळ बांधून निवडणूक लढवावी लागू शकते.

 

मलकापुरात काय?

  मलकापूर येथून माजी आमदार चैनसुख संचेती आणि शिवचंद्र तायडे या भाजपच्या इच्छुकांमधील वाद कमालीचा टोकाला गेल्याने मनिष लखानी या नव्या चेहऱ्याचा विचार भाजपच्या शिर्ष नेतृत्वाकडून सुरू आहे.  मलकापूर आणि सिंदखेडराजा वगळता महायुतीने ५ जागांची घोषणा महाविकास आघाडीवर आजघडीला आघाडी घेतली आहे.. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा केव्हा सुटतो? बुलडाणा विधानसभा बाबत काय निर्णय होतो?  याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे....