Amazon Ad

ELECTION SPECIAL एका रात्रीतून मनोज कायंदेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ कशी पडली? सिंदखेड राजा मतदारसंघात राजकीय चर्चांना उधाण;

 अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझींच्या हेतुवरच संशय...
 
  
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वाधिक गोंधळ उडाला तो सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात. जिल्हा बँकेच्या हिताचे कारण सांगून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले डॉ.शिंगणे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले. मात्र हे करीत असताना बरेच दिवस त्यांची भूमिका तळ्यात मळ्यात अशीच होती..काठावर येऊन थांबलेल्या डॉ. शिंगणेंनी काठाच्या पलीकडे जाण्यासाठी घेतलेला वेळ महायुतीच्या इच्छुकांना गोंधळात टाकून गेला...त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत महायुतीच्या अधिकृत उमेदवारावर शिक्कामोर्तब झालेच नाही..शिंदेंच्या शिवसेनेने माजी आ. शशिकांत खेडेकरांना उमेदवारी दिल्याची बातमी २८ ऑक्टोबरच्या रात्री धडकली अन् रात्रीतून पुन्हा एक मोठा धमाका झाला..ज्याचा आवाज २९ ऑक्टोबरला सकाळी झाला..महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवार राष्ट्रवादीचे सध्याचे(?) जिल्हाध्यक्ष ॲड. काझी यांनी काँग्रेसमधल्या मनोज कायदेंसाठी ताकद लावून एबी फॉर्म आणला..शिवसेनेकडून डॉ.खेडेकरांनी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मनोज कायंदेंनी उमेदवारी अर्ज भरला..आता मतदारसंघातील तमाम जनतेला प्रतीक्षा आहे ती ४ नोव्हेंबरची..कारण या दिवशी अर्ज मागे घेण्याचा दिवस असून तोपर्यंत आणखी काय घडामोडी होतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे...तोपर्यंत मतदारसंघात विविध चर्चां सुरूच राहणार आहे.. तिकीट मिळवण्याच्या स्पर्धेत तुलनेने मागे असणाऱ्या मनोज कायंदेंच्या गळ्यात अशी अनपेक्षित माळ कशी पडली? पडद्याआड नेमक्या काय घडामोडी घडल्या? यावर आता तर्क विर्तकांना उधाण आले आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांच्या हेतूवरच संशय घेतल्या जात आहे...
  डॉ.शिंगणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्यानंतर ॲड.काझी यांनी आपण अजित पवारांसोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाची जागा लढवणार असल्याचेही ते म्हणाले होते. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नसल्याने भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या उमेदवाराला घड्याळ चिन्ह देऊन निवडणूक लढवावी लागू शकते अशी चर्चा देखील सुरू झाली होती.
डॉ.सुनील कायंदे, विनोद वाघ, डॉ.शशिकांत खेडेकर या इच्छुकांची नावे जोरदार चर्चेत होती, या तुलनेत मनोज कायंदे यांचे नाव अगदी शेवटच्या दिवसापर्यंत चर्चेत नव्हते.डॉ.शशिकांत खेडेकर राष्ट्रवादीत प्रवेश करून घड्याळ मनगटावर बांधणार असल्याच्या बातम्याही येऊ लागल्या होत्या. त्या दृष्टीने तशी मानसिक तयारी डॉ.खेडेकर आणि डॉ.सुनील कायंदे या दोघांकडून देखील झाली होती. मात्र अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवस उजाडण्याआधी डॉ.शशिकांत खेडेकर यांचे नाव शिंदे यांच्या शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले.
आता डॉ.शशिकांत खेडेकर हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार राहतील हे स्पष्ट होत असताना दुसऱ्या दिवशी सकाळी मनोज कायंदे यांना थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एबी फॉर्म मिळाल्याची बातमी धडकली अन् एकच गोंधळ उडाला..तो गोंधळ अद्यापही कायम आहे.. आता महायुतीचे वरिष्ठ नेते सिंदखेड राजा मतदारसंघाबाबत नेमका काय निर्णय घेतात? दोघांपैकी एकाला माघार घ्यावी लागते की मैत्रीपूर्ण लढत होते हे ४ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे..
  ॲड.काझी यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात...
 वर्ष सव्वा वर्षाआधी जेव्हा अजित पवारांनी महायुतीत येण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा डॉ.राजेंद्र शिंगणे आऊट ऑफ कव्हरेज होते. त्यामुळे डॉ.राजेंद्र शिंगणे यांची नेमकी भूमिका काय हे 'त्या"दिवशी समोर आले नव्हते. माध्यमांनी जिल्हाध्यक्ष या नात्याने ॲड.काझी यांची भूमिका विचारली तेव्हा त्यांनी शरद पवारांसोबत असल्याचे म्हटले होते.
मात्र डॉ.राजेंद्र शिंगणे परतल्यानंतर त्यांनी जिल्हा बँकेच्या हिताचे कारण सांगून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जात असल्याचे जाहीर केले..त्यावेळी काझी यांना त्यांची भूमिका कुणी विचारलीही नव्हती..कारण डॉ.शिंगणे यांची भूमिका हीच काझी यांची भूमिका हे समीकरण ठरलेले होते..पुढे काझी आपोआप डॉ.शिंगणे यांच्यासोबत आणि पर्यायाने अजित पवारांच्या महायुतीसोबत दिसले..मात्र यावेळी ॲड.
काझी यांनी स्वतःहून अजित पवारांच्या महायुती सोबत राहण्याची भूमिका घेतली की "सोयीचे राजकारण आणि सोयीची लढत" व्हावी म्हणून त्यांना कुणी अशी भूमिका घ्यायला लावली? असे प्रश्नार्थक सवाल आता मतदार संघातील गाव कट्ट्यांवर होऊ लागले आहेत.त्यासाठी मनोज मनोज कायदेंनाच कशी अनपेक्षित उमेदवारी मिळाली? याचा संदर्भ दिल्या जात आहे....