ELECTION SPECIAL प्रस्थापित आकाश फुंडकर अन् डॉ. संजय कुटेंना कोण देणार टक्कर? वंचितचा प्रभाव कमी झाल्याने निवडणूक जड जाणार! हिंदुत्ववादी मतदारांची मोट बांधण्याची गरज.
Oct 21, 2024, 09:24 IST
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या पहिल्या ९९ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. खामगाव मधून आकाश फुंडकर आणि जळगाव जामोद मधून पुन्हा एकदा डॉ.संजय कुटे या प्रस्थापितांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोघांना टक्कर कोण देईल? त्या उमेदवारांची नावे आजघडीला जाहीर नाहीत. मात्र खामगावमधून माजी आमदार दिलीपकुमार सानंदा तर जळगाव जामोद मधून स्वाती वाकेकर किंवा प्रसेनजीत पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे.आमदार फुंडकर गत १० वर्षांपासून तर आ.कुटे गत २० वर्षांपासून सभागृहाचे सदस्य आहेत.नाही म्हटले तरी प्रस्थापित विरोधी लाटेचा सामना या दोघांना करावाच लागणार आहे..अर्थात ती लाट किती प्रभावशाली होईल हे विरोधकांच्या रणनीतीवर अवलंबून आहे...
खामगाव आणि जळगाव जामोद या दोन्ही मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले. यामुळे आ.फुंडकर आणि आ.कुटेंचा आत्मविश्वास दुणावला आहे. मात्र असे असले तरी फुंडकर आणि कुटेंना विकास कामांचा हिशोब जनतेला द्यावा लागेल. वनवासी बहुल असलेल्या जळगाव जामोद मतदारसंघात आ.कुटे यांना प्रचंड मेहनत करावी लागेल..निवडणुकीला हलक्यात घेणे त्यांना अडचणीचे ठरू शकते..
हिंदुत्ववादी मतदारांची मोट बांधण्याची गरज...
दुसरीकडे खामगाव विधानसभा मतदारसंघात विकासकामे बऱ्यापैकी झाले असले तरी त्याच्या प्रचार - प्रसिद्धीत आ. फुंडकर कमी पडल्याचे चित्र आहे. शिवाय आ.फुंडकर यांचा व्यक्तिगत जनसंपर्क पाहिजे तेवढा नाही. विधानसभा निवडणुकीत हिंदुत्व विचारधारेच्या मतदारांची मोट आकाश फुंडकर यांना बांधावी लागणार आहे. कारण गेल्या दोन निवडणुकांत वंचितचा जसा प्रभाव होता तसा यावेळेला दिसत नाही.
गेल्या दोन निवडणुकांत वंचितला पडलेली बहुतांश मते यावेळी महाविकास आघाडीकडे जातांना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने दलित आम्ही मुस्लिम समाजाच्या मनात जो काही नेरेटीव्ह सेट केला होता त्याचा फटका त्यावेळी महायुतीला झाला..तो टाळण्यासाठीआ. फुंडकर आणि आ.कुटेंना रणनीती आखावीच लागेल....