ELECTION SPECIAL ३ लाख २१ हजार ११५ मतदार ठरवणार सिंदखेडराजाचा आमदार! चिखली विधानसभेचे भवितव्य ३ लाख ३ हजार ७३२ मतदारांच्या हाती...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेड राजा मतदार संघात मतदारसंघात यावेळी चार मतदान केंद्रांची वाढ झाली आहे. लोकसभेच्या तुलनेत सात हजार नवमतदार वाढले असून ३ लाख २१ हजार ११५ मतदार सिंदखेड राजाचा आमदार ठरवणार आहे. दुसरीकडे चिखली विधानसभेचे भवितव्य ३ लाख ३ हजार ७३२ मतदारांच्या हाती आहे.

सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाबाबत काल, गुरुवारी तहसील कार्यालयात पत्रकार परिषद झाली. प्रांत अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदारसंघात जवळपास ७ हजार नवमतदारांनी आपली नावे नोंदवली असल्याचे सांगत या आधी मतदारसंघात ३३६ मतदान केंद्र अस्तित्वात होती. यात मतदारांच्या सुविधेसाठी चार केंद्रांची वाढ करण्यात करण्यात आली आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील आंभोरा/जांभोरा यात जांभोरा, सिंदखेडराजामध्ये पांगरी

उगले आणि सिंदखेडराजा शहरात दोन मतदान केंद्र वाढविण्यात आले आहेत. नियमित प्रमाणे मतदारसंघात ७ ठिकाणी तपासणी पथके नियुक्त केली जाणार आहेत. पक्षाचे किंवा आक्षेपार्ह बॅनर, पोस्टर हटविण्यासाठी पंचायत समिती गटविकास अधिकारी व पालिका मुख्याधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली असल्याचेही यावेळी त्यांनी बोलतांना सांगितले.
सिंदखेराजा मतदारसंघात एकूण ३ लाख २१ हजार ११५ मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार १ लाख ६७ हजार ७१६, तर महिला मतदारसंख्या १ लाख ५३ हजार ३९९ इतकी आहे. दरम्यान, एप्रिल २०२४ ते १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ६ हजार ९३७ मतदार वाढले असल्याची माहिती प्रा.खडसे यांनी दिली.
चिखलीचे चित्र असे....
चिखली विधानसभा मतदारसंघात यावेळी ३ लाख ३ हजार ७३२ मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र आहेत. त्यात १ लाख ५६ हजार २५७ पुरुष तर महिला मतदारांची संख्या १ लाख ४७ हजार ४७५ एवढी आहे. ३१७ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. चिखली विधानसभा मतदारसंघात आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी ४० पथके तयार करण्यात आली आहे. ६ फिरते पथक, ४ स्थिर पथक , ६ व्हिडिओ सर्वेक्षण पथक, २ खर्च नियंत्रण पथक अशी रचना करण्यात आली आहे. चिखली विधानसभा मतदारसंघात चिखली तालुक्यातील ९५ व बुलढाणा तालुक्यातील ४४ अशा १३९ गावांचा समावेश आहे...