मेहकरात एकनाथ शिंदेंच्या सभेला उसळला भगवा जनसागर! मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमदार रायमुलकर लोकांच्या सुखदुःखात धावून जाणारा नेता; ते १ लाखांच्या लीडने विजय होतील!

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर हा शिवसेना महायुतीचा बालेकिल्ला आहे. गेल्या ३० वर्षांपासून इथली जनता शिवसेनेवर प्रेम करत आहे. संजय रायमुलकर यांनी विजयाची हॅट्रिक ठोकली आहे आता विरोधकांची चौथी विकेट घेऊन चौकार मारायचा आहे. मैदानात असलेले सगळे प्रतिस्पर्धी क्लीन बोल्ड होतील कारण संजय रायमुलकर हा भरवशाचा प्लेयर आहे..त्यांच्या आडनावात "कर" आहे त्यामुळे त्यांना कर म्हणावे लागत नाही, त्यांनी आधीच करून दाखवले आहे.तब्बल साडेचार हजार कोटी रुपये त्यांनी मेहकर मतदारसंघासाठी आणली आहेत. मागील निवडणुकीत या पठ्याने ६२ हजारांची लीड घेतली होती आता १ लाखांच्या लीडने ते विजयी होतील असा दुर्दम्य आशावाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मेहकर येथे आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदे यांची आज,१२ नोव्हेंबरला जाहीर सभा पार पडली..यावेळी रेकॉर्ड ब्रेक उचललेल्या जनसागराला संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव, महायुतीचे उमेदवार डॉ. संजय रायमुलकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 यावेळी पुढे बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, केंद्रात प्रतापराव जाधव मंत्री आणि संजयभाऊ इथे आमदार आहे त्यामुळे मेहकर ची जनता नशीबवान आहे इथे विकास गंगा वाहत आहे असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. संजय रायमुलकर यांनी विकास केला, विश्वास कमवला म्हणून इथे एवढी गर्दी जमली असल्याचेही ते म्हणाले. संजय रायमुलकर सर्वांच्या सुखदु:खात धावून जाणारा नेता आहे, त्यामुळे इथली जनता त्यांच्यावर मनापासून प्रेम करते असे उद्गारही शिंदे यांनी काढले.आमदार रायमुलकर यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात ३०-३५ कोटी मिळाले आणि महायुती सरकारच्या काळात साडेचार हजार कोटी मिळाले असे म्हणत आपण घेतलेला निर्णय योग्य होता असे ते म्हणाले.
मूळ शिवसेनेचा मतदार आपल्यासोबत...
   मूळ शिवसेनेचा मतदार आपल्यासोबत आहे. मात्र दुसऱ्या बाजुला त्यांच्यासोबत काँग्रेसची व्होट-बँक आली. ती सूज आहे मात्र सूज कायम राहत नाही असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठा शिवसेनेला लगावला.
 
महायुतीचे सरकार देना बँक...
महायुतीचे सरकार हे देना बँक आहे. हे देणारे सरकार आहे, घेणारे सरकार नाही. हप्ते घेऊन जेलमध्ये जाणारे हे सरकार नाही असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. २० नोव्हेंबरला मतदान झाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचा हफ्ता जमा होईल असे ते म्हणाले
शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार..
महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे. शेतकरी सन्मान योजनेतून आता वर्षाला १५ हजार रुपये देण्यात येणार आहे असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्यासाठीचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. २५ लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय सुद्धा महायुती सरकारने घेतल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भावांतर योजनेचा निर्णय आपण घेतल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. जर अडीच वर्षांपूर्वी आम्ही निर्णय घेतला नसता सरकार बदलले नसते तर आम्हीही निर्णय घेऊ शकलो नसतो असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. भाषणाच्या शेवटी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ.संजय रायमुलकर यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले...