अठरा पगड जाती डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्यासाठी एकवटल्या! ही लढाई शेतकऱ्यांच्या हक्कासाठी! डॉ.ऋतुजा चव्हाण यांचे प्रतिपादन; शेतकरी चळवळ डॉ.ऋतुजा चव्हाण यांच्या पाठीशी;

 गावोगावच्या शेतकऱ्यांचा एकमुखी निर्धार....

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉ.ऋतुजा चव्हाण यांना विविध समाज घटकांचा वाढता पाठिंबा मिळतो आहे. शेतकऱ्यांचा पिक विमा, अतिवृष्टी, सोयाबीन कापसाच्या भाव वाढी संदर्भात चव्हाण दांपत्याने केलेला संघर्ष, रविकांत तुपकर यांच्या खांद्याला खांद्या देऊन शेतकरी चळवळीप्रती ठेवलेली निष्ठा यामुळे डॉ. ऋतुजाताई चव्हाण यांच्यासोबत गावोगावचा शेतकरी एकवटला आहे. शिवाय मतदारसंघातील १८ पगड जाती डॉ. ऋतुजा चव्हाण या सर्व समावेशक नेतृत्वाच्या पाठीशी उभ्या राहत असल्याने आतापर्यंतच्या प्रचारात त्यांनी जोरदार आघाडी घेतली आहे. डॉ. संजय रायमुलकर यांच्याशी त्यांची थेट लढत होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान डॉ. ऋतुजा चव्हाण यांना मिळणारा वाढता पाठिंबा पाहता काही विरोधक वेगवेगळ्या अफवा पसरवत असले तरी संबंध शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी डॉ.ऋतुजा चव्हाण यांच्या पाठीशी उभे राहण्याचा एकमुखी निर्धार केलेला आहे..

 "गेली ३० वर्षे विरोधकांनी या मतदारसंघाला मागासलेले ठेवले. मतदारसंघात धड रस्ते नाहीत, की लोकांना पाणी नाही. आरोग्याची तर अतिशय दुरवस्था आहे. मतदारसंघात कधी नव्हे तो जातीयवाद माजलेला आहे. दादागिरी व गुंडगिरी बोकाळलेली आहे. शेजारच्या चिखली व बुलढाणा मतदारसंघात जोरदार विकास होऊ शकतो, तर मेहकर-लोणारमध्ये का नाही? विकासाचा हा अनुशेष भरून काढण्यासाठीच आपण विधानसभेची निवडणूक लढवत आहोत, आणि आपली भूमिका सर्व मायबाप मतदार जनतेला पटलेली आहे. येत्या २० तारखेला ही जनताच मला मतदान यंत्रातून भरभरून आशीर्वाद देतील. माझ्याबाबत काहीही अफवा पसरविणार्‍यांना जनतेचे मतदान हेच उत्तर असेल असे डॉ.ऋतुजा चव्हाण ठणकावून सांगत आहेत. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता मतदानरुपी आशीर्वाद द्यावे अशी विनंतीही डॉ.ऋतुजा चव्हाण यांनी केली आहे..