EXCLUSIVE विधान परिषदेवर लागणार डॉ.संजय रायमुलकरांची वर्णी? एकनाथ शिंदे रायमुलकरांचे पुनर्वसन करणार? २७ मार्चला विधान परिषदेची निवडणूक...

 
बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत मोठा उलटफेर झाला. सट्टेबाजारासह राजकीय विश्लेषक देखील मेहकरची जागा डॉ. संजय रायमुलकर जिंकतील हे प्रचंड आत्मविश्वासाने सांगत होते. मात्र निकाल सर्वांनाच अचंबित करणारा ठरला आणि प्रशासकीय सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेऊन राजकारणात आलेले सिद्धार्थ खरात मेहकरचे आमदार बनले. डॉ. रायमुलकरांचा पराभव झाल्यानंतर त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायमुलकरांना फोन केला. "काळजी करू नको, खचू नको, तुला विधान परिषदेवर घेतोय.."असे एकनाथ शिंदे डॉ. रायमुलकरांना म्हणाले होते. आता विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ५ जागांसाठी २७ मार्चला होणार आहेत. रिक्त झालेल्या सर्व जागांवरील आमदार महायुतीचे होते. सध्याचे संख्याबळ पाहता पाचही जागा महायुती जिंकणार हे स्पष्ट आहे..अशा स्थितीत एकनाथ शिंदे डॉ.संजय रायमलकर यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांचे पुनर्वसन करतील का ? याकडे राजकीय वर्तुळासह सामान्य शिवसैनिकांच्या देखील नजरा लागल्या आहेत. कारण रायमुलकरांच्या पराभवानंतर त्यांना विधान परिषदेवर घेण्यात यावे अशी मागणी शिवसैनिकांमधून सातत्याने समोर येत आहे..
  २००९ ,२०१४ आणि २०१९ अशा तिन्ही निवडणुका डॉ. संजय रायमुलकर यांनी चढत्या बहुमतांनी जिंकल्या होत्या. यावेळी प्रतिस्पर्धी उमेदवार पाहता डॉ. संजय रायमुलकर बहुमताचा विक्रम मोडीत काढतील आणि विजयाचा चौकार ठोकतील असेच एकंदरीत चित्र होते.मात्र याच ओव्हर कॉन्फिडन्स च्या नादात डॉ. रायमुलकरांच्या प्रचार यंत्रणेचे काही मुद्द्यांवर दुर्लक्ष झाले आणि पदरी अनपेक्षित पराभव पडला. या पराभवानंतर शेकडो शिवसैनिकांच्या डोळ्यात अश्रू होते, सामान्य शिवसैनिकाला हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला, कारण शाखाप्रमुख ते आमदार हा आ. रायमुलकरांचा प्रवास मतदारसंघाने अनुभवला होता. हात दाखवा आणि गाडी थांबवा असा रायमुलकरांचा स्वभाव असल्याने जीव ओवाळून टाकणारी माणसे डॉ. रायमुलकरांनी तयार केली. डॉ.रायमुलकरांनी विजयाचा चौकार मारला असता तर त्यांची मंत्रिमंडळातील वर्णी निश्चित समजल्या जात होती. त्यामुळे आता डॉ. संजय रायमुलकर यांना शिवसेनेकडून संधी दिल्या जाते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या पाच जागांपैकी १ जागा शिंदेंच्या शिवसेनेची, १ जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तर ३ जागा भाजपच्या आहेत. शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी हे विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागेवर डॉ. संजय रायमुलकर यांची वर्णी लावावी अशी मागणी बुलढाणा जिल्हा शिवसेनेतून समोर येत आहे.
 शिंदेचे ५ आमदार पराभूत! आधी संधी कुणाला?
एकनाथ शिंदेंना बंडात साथ देणाऱ्या ४० पैकी ५ आमदारांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामध्ये माहीमचे सदा सरवणकर, भायखळा येथील यामिनी जाधव, उमरगा मतदार संघातून ज्ञानराज चौगुले, काय झाडी काय डोंगर फेम सांगोल्याचे शहाजी बापू देशमुख आणि मेहकरचे डॉ. संजय रायमुलकर यांचा समावेश आहे. उठाव करणाऱ्या आमदारांची साथ सोडणार नाही, असा शब्द एकनाथ शिंदेंनी दिलेला होता. त्यामुळे आता विधान परिषदेवर पहिल्यांदा ५ पैकी कुणाची वर्णी लागते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..