डॉ.ऋतुजा चव्हाण देणार तगडी फाईट! मेहकर मतदारसंघातील समीकरणे बदलणार? महाविकास आघाडीतील असंतोष डॉ.चव्हाण यांना ठरणार फायद्याचा....
Oct 22, 2024, 15:35 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वंचित बहुजन आघाडीने काल डॉ.ऋतुजा चव्हाण यांना मेहकर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली. संपूर्ण मतदारसंघात या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी योग्य निर्णय घेतला अशा प्रतिक्रिया आता मतदारसंघात उमटू लागल्या आहेत..एकंदरीत डॉ.चव्हाण यांच्या निवडणुकीतील अधिकृत एन्ट्रीने अनेकांना धक्का बसला आहे.डॉ.ऋतुजा चव्हाण या आमदार डॉ.संजय रायमुलकर यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण करू शकतात..
शेतकरी आणि सहकार चळवळीशी नाते असलेल्या डॉ.ऋतुजा चव्हाण उच्चशिक्षित तरुण उमेदवार आहेत. विशेष म्हणजे स्थानिक उमेदवार असल्याने त्यांचा संपर्क, नातेगोते हा गोतावळा देखील मोठा आहे. त्याचा फायदा या निवडणुकीत डॉ.ऋतुजा चव्हाण यांना होणार आहे. महाविकास आघाडीने अद्याप कुणाचेही नाव जाहीर केलेले नाही. सिद्धार्थ खरात यांच्या नावाची दावेदारी उमेदवारीसाठी होत असली तरी स्थानिक उमेदवार नसल्याने त्यांच्याप्रती निष्ठावंत शिवसैनिकांची फारशी आपुलकी नाही,कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर ते शिवसेनेत आले आहेत. शिवाय अनेक निष्ठावंत शिवसैनिकांनी उमेदवारीसाठी प्रयत्न चालवले आहेत..अशा स्थितीत शिवसेना आणि महाविकास आघाडीतील गटबाजी डॉ.ऋतुजा चव्हाण यांच्या पथ्यावर पडण्याचे एकंदरीत चित्र आजघडीला आहे..