विराट जनसमुदायाच्या साक्षीने डॉ.ऋतुजा चव्हाण यांनी भरला उमेदवारी अर्ज! वंचितचे प्रदेशाध्यक्ष तय्यब जफर म्हणाले, मेहकरात वंचितच घडवणार परिवर्तन!

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विराट जनसमुदायाच्या साक्षीने वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ.ऋतुजा चव्हाण यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी झालेल्या जाहीर सभेला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तय्यब जफर यांनी संबोधित केले. मेहकर मतदार संघाला परिवर्तनाची गरज आहे, आणि हे परिवर्तन घडवण्याची धमक फक्त वंचित बहुजन आघाडीतच आहे असे ते म्हणाले. यावेळी शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले,तय्यब जफर प्रदेशाध्यक्ष, डॅा. ज्ञानेश्वर टाले , महेंद्र पनाड , दिलीप राठोड , मोबिन शाह , गजानन भाऊ कावरखे , श्याम अवथळे,प्रफुल्ल देशमुख , गणेश गरोळे , महेश देशमुख ,कैलास उत्पुरे , ओंकार चव्हाण , बबनराव वानखेडे , आबाराव वाघ यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

मेहकर मतदार संघ विकासापासून वंचित आहे. मेहकर चा विकास डॉ. ऋतुजा चव्हाण याच करू शकतात.कारण त्यांना समस्यांची जाण आहे असे प्रतिपादन यावेळी प्रदेशाध्यक्ष तय्यब जफर यांनी केले. डॉ. ज्ञानेश्वर टाले म्हणाले की, डॉ. ऋतुजा चव्हाण या नव्या दमाचे नेतृत्व आहेत. मेहकर विधानसभा मतदारसंघाला विकासाच्या उंचीवर घेऊन जायचे असेल तर डॉ.यांच्या पारड्यात मतांचे दान द्या असे आवाहन यावेळी त्यांना केले. डॉ.ऋतुजा चव्हाण यांनी राजकारणात प्रवेश करण्याविषयीची भूमिका विषद केली.

राजकीय व्यवस्थेला केवळ दोष दिल्यापेक्षा आपण त्यात जाऊन हे दोष कसे दूर करू शकतो या विचाराने राजकारणात आल्याचे त्या म्हणाल्या. मेहकर विधानसभा मतदारसंघात सिंचनाची सोय नाही, शिक्षणाची सोय नाही, आरोग्याचाही प्रश्न आहे, तरुणांना नोकऱ्या नाही.त्यामुळे या समस्या विधिमंडळात मांडण्यासाठी तुमची लेक म्हणून मी आवाज उठवणार आहे असे त्या म्हणाल्या..