डॉ.राजेंद्र शिंगणे आज भरणार उमेदवारी अर्ज! खा.अमोल कोल्हे राहणार उपस्थित! अर्ज भरण्याआधी डॉ. शिंगणेंनी वडिलांच्या स्मृतीस्थळी माथा टेकवला माथा...
Oct 25, 2024, 09:20 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सहाव्यांदा विजय मिळवण्यासाठी सज्ज झालेले डॉ.राजेंद्र शिंगणे आज,२५ ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी होणाऱ्या जाहीर सभेला खा. अमोल कोल्हे संबोधित करणार आहेत. राष्ट्रमाता जिजाऊंच्या राजवाड्यासमोर ही जाहीर सभा होणार असून त्यानंतर डॉ.शिंगणे आपला नामांकन अर्ज दाखल करतील. दरम्यान आज सकाळीच डॉ.शिंगणे यांचे कुटुंबीयांनी औक्षण केले. त्यानंतर डॉ.शिंगणे यांनी सहकुटुंब स्व. भास्कररावजी शिंगणे यांच्या स्मृतिस्थळी जाऊन माथा टेकवला. मतदार संघातील जनतेचा आशीर्वाद माझ्याबरोबर आहे. या आशीर्वादाच्या बळावर आम्ही या निवडणुकीला सामोरे जात असून जनता आपल्यासोबत असल्याने विजय निश्चित आहे अशी प्रतिक्रिया डॉ.शिंगणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
२०१४ चा अपवाद वगळता ( त्यावेळी डॉ.शिंगणे यांनी निवडणूक लढवली नव्हती) १९९५ पासून सिंदखेड राजा मतदारसंघावर डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा एकछत्री अंमल राहिला आहे. तब्बल ५ वेळा या मतदार संघाने त्यांना सभागृहात पाठवले आहे. ही त्यांची सहावी विधानसभा निवडणूक असून यावेळी ते तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. अद्याप महायुतीने सिंदखेड राजा मतदारसंघात आपला उमेदवार जाहीर केलेला नाही, त्यामुळे सध्यातरी डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी निवडणुकीच्या तयारीत आघाडी घेतल्याचे चित्र आहे..