डॉ.राजेंद्र शिगणेंनी मतदारसंघाची वाट लावली! डॉ. शशिकांत खेडेकरांचा हल्लाबोल...! म्हणाले, लोकांनी आता ठरवलंय, भुलथापा मारणाऱ्या डॉ. शिंगणेंना धडा शिकवणार...
Nov 9, 2024, 17:53 IST
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आता रंगात आली आहे. महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होत असली तरी मुख्य लढत ही डॉ.शशिकांत खेडेकर आणि विद्यमान आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्यातच होणार असल्याचे चित्र आहे. गायत्री शिंगणे आणि मूळचे काँग्रेसी विचारसरणीचे असलेले मनोज कायंदे यांचा फटका हा डॉ.राजेंद्र शिंगणे यांनाच बसू शकतो अशी मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवाय डॉ. शशिकांत खेडेकर यांनी मिळवलेली विकास पुरुष अशी प्रतिमा आणि सहानुभूती या बाबी डॉ.खेडेकर यांच्या पथ्यावर पडू शकतात. दरम्यान, ७ नोव्हेंबरला डॉ. शशिकांत खेडेकर यांचा लोणार तालुक्यातील वझर आघांव या गावांत झंजावती प्रचार दौरा झाला.. या प्रचार दौऱ्याला जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. यावेळी मतदारांशी संवाद साधताना डॉ.शशिकांत खेडेकर यांनी डॉ. शिंगणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी २५ वर्षांत मतदारसंघाची वाट लावली असा घणाघात डॉ. खेडकर यांनी केला.
पुढे बोलतांना डॉ.खेडेकर म्हणाले की, २०१४ ते २०१९ या काळात मतदारांनी जनतेची सेवा करण्याची संधी दिली. ५ वर्षांत २३०० कोटी रुपयांचा निधी आपण सिंदखेडराजा मतदारसंघासाठी खेचून आणला.
महायुती सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून देऊळगाव राजा सिंदखेडराजा शहरांच्या पायाभूत सुविधांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आपण मंजूर करून आणला.
मात्र इथल्या आमदारांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.आपण काहीही केले तरी लोक आपल्यालाच मतदान करतात असे त्यांनी गृहीत धरले आहे, त्यामुळे जनतेला गृहीत धरणाऱ्यांना धडा शिकवा असे आवाहन डॉ.खेडेकर यांनी केले. ते आता भूलथापा देतील, माझी शेवटची निवडणूक आहे असे म्हणतील मात्र त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका असेही डॉ.खेडेकर म्हणाले.