केसगळती प्रकरणात आरोग्य मंत्री बोर्डीकरांनी सभागृहाची दिशाभूल केली? हक्कभंग दाखल करण्याची आ. लिंगाडे यांची मागणी...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, कठोरा, भोनगाव यासह १८ गावांमध्ये केसगळतीची साथ पसरली आहे. दरम्यान यासंदर्भात आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सभागृहात उत्तर देताना बरेच संभ्रम निर्माण केले. चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करीत विधान परिषद आ.धीरज लिंगाडे यांनी मेघना बोर्डीकर यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याची मागणी केली आहे. तशा आशयाचे पत्र त्यांनी विधानपरिषदेच्या सभापतींना लिहिले आहे.
   २० मार्च रोजी या विषयासंदर्भात विधान परिषदेमध्ये चर्चा झाली होती. त्यावेळी आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी उत्तर देतांना " ज्या लोकांना याची बाधा झाली आहे, त्यांचे केस रक्ताच्या चाचण्या तसेच गहू , पाणी, माती परीक्षणासाठी आयसीएमआर कडे पाठविण्यात आल्याचे सांगितले होते. आयसीएमआर कडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर उपाययोजना केल्या जातील असेही मेघना बोर्डीकर म्हणाल्या होत्या. दरम्यान यावर अनेक खाजगी संशोधक आणि संस्था यांनी केलेल्या संशोधनात या गावातील आहारात असलेल्या रेशनच्या गव्हामध्ये सेलेनियमचे प्रमाण १४.५२ पीपीएम इतके जास्त असल्याचा निष्कर्ष काढून जाहीर केला आहे. याबाबतची तपासणी शासनमान्य प्रयोगशाळेत झालेली आहे. वस्तूतः गव्हामध्ये सेलेनियम चे प्रमाण हे ०.१ ते १.९ पीपीएम असले पाहिजे. असे असताना मंत्री महोदयांनी याचा उल्लेख आपल्या उत्तरात केला नसल्याचे आ. धीरज लिंगाडे यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे याबाबतची जाहीर प्रसिद्धी दि हिंदू या दैनिकात आयसीएमच्या रिपोर्टनुसार गवात सेलेनियम चे प्रमाण जास्त असल्याबाबत ३ मार्च रोजी केली होती. पद्मश्री डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांनी देखील गव्हात सेलेनियम चे प्रमाण जास्त असल्यास निष्कर्ष काढला होता.
 
हक्कभंग दाखल करा..
मंत्री महोदयांनी या संदर्भात उत्तर देताना संभ्रम निर्माण केले आहेत. चुकीची माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. सर्वोच्च सभागृहाला अशा पद्धतीने चुकीची माहिती दिल्याने सार्वभौम सभागृहाचा अवमान होत असल्याचेही आ.लिंगाडे यांनी विधान परिषदेच्या सभापतींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे मेघना बोर्डीकर यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे..