Amazon Ad

चैनसुख संचेतींनी पक्षाची शिस्त मोडली? उमेदवारी घोषित व्हायच्या आधीच म्हणे "भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार..."भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी...

 
 मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मलकापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला असला तरी भाजपने आपले पत्ते अद्याप उघडले नाहीत. भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी माजी आमदार चैनसुख संचेती इच्छुक असले तरी अद्याप त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालेले नाही. सातत्याने तोच तोच चेहरा असल्याने भाजपने चेहरा बदलून द्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांची आहे.. मात्र पक्षाने एवढी संधी देऊनही चैनसुख संचेती मात्र स्वतःच्या उमेदवारीसाठी अद्यापही आग्रही आहेत.. मलकापूरच्या उमेदवारीचा तिढा दिल्ली दरबारी पेंडिंग असूनही संचेती यांनी स्वतःला भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून घेणे सुरू देखील केले आहे. तसे पत्रच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहे.त्यामुळे आता संचेती भाजपची शिस्तही विसरले का? असा सवाल निर्माण होत आहे..

  चैनसुख संचेती यांच्या वतीने मोहन किसन शर्मा यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे रॅलीची परवानगी मागितली आहे. तसा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आला असून त्यावर चैनसुख संचेती यांचा उल्लेख "भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार" असा केलेला आहे. २८ ऑक्टोबरला संचेती अर्ज भरणार असल्याचेही त्यात नमूद आहे. शिवाय भाजपच्या कमळाचा शिक्का देखील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रावर मारला आहे. संचेती यांना भाजपची उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर झालेली नाही. भाजपची ओळख शिस्तबद्ध पक्ष अशी असताना संचेती असा शिस्तभंग का करत आह? असा सवाल उपस्थित होत आहे...