भरधाव ट्रकने चिरडले; मलकापुरात व्यापाऱ्याचा मृत्यू....

 
 मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला अक्षरशः चिरडले. या अपघातात खान्देशातील एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला. राष्ट्रीय महामार्ग ५३ वर मुंदडा पेट्रोल पंपाजवळ १० डिसेंबरच्या सकाळी दहा वाजता हा अपघात घडला.

  अजय रत्नकांत पाटील (३७, रा. पारोळा जि. जळगाव खान्देश) असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे. तसेच प्रसाद भटु वाणी (४६) हे जखमी झाले आहेत. टाटा कंपनीचा ट्रक (क्रमांक आरजे-१९-जीसी-४१३३) हा चालक निंबाराम डुंगाराम (रा. नेहरुनकी धानी ता. गुंडामलानी जि. बारमेर राजस्थान) याने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून एमएच-१९- बीझेड-९२७५ क्रमांकाच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेले अजय पाटील जागीच ठार झाले. तसेच प्रसाद वाणी जखमी झाले. या प्रकरणी आरोपी ट्रकचालक निंबाराम डुंगाराम यास पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम १०६, २८१, १२५, १२५ (बी), १८४ अन्वये गुन्हे दाखल करून अटक केली.