Exclusive प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातच काँग्रेसची ‘बूथ टेस्ट’ नापास?; भाजप नंबर वन, शिंदेंची शिवसेना दुसऱ्या स्थानी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद तळाला!

 
 बुलढाणा (अनंता काशिकर: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :निवडणुका जिंकण्यासाठी सभा, मेळावे आणि सोशल मीडियावरील प्रचार महत्त्वाचा असला तरी खऱ्या अर्थाने लढाई बूथवरच ठरते. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षासाठी बूथ पातळीवरील संघटनात्मक ताकद ही विजयाची सर्वात मोठी गुरुकिल्ली मानली जाते. सध्या राज्यभर सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेदरम्यान समोर आलेल्या आकडेवारीने बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या संघटनात्मक ताकदीचे वास्तव उघड केले आहे.

जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण २,२८८ बूथ आहेत. या बूथवर नियुक्त करण्यात आलेल्या बूथ लेव्हल एजंट (बीएलए) यांच्या संख्येनुसार भारतीय जनता पक्ष जिल्ह्यात सर्वात आघाडीवर असल्याचे दिसून येते. भाजपने २,१०६ बूथवर बीएलए नियुक्त केले असून जिल्ह्यातील बहुतांश मतदान केंद्रांवर पक्षाची उपस्थिती निर्माण केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही २,०८७ बूथवर बीएलए नियुक्त करून संघटनात्मक ताकद सिद्ध केली आहे.

मात्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचाच जिल्हा असलेल्या बुलढाण्यात काँग्रेसची कामगिरी अपेक्षेपेक्षा खूपच कमी दिसून येत आहे. काँग्रेसला केवळ १,३६५ बूथवरच बीएलए नियुक्त करता आले आहेत. महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची स्थितीही काही फार वेगळी नसून पक्षाकडे १,२३५ बूथवर बीएलए आहेत.

राज्यात सत्तेचा भाग असलेल्या आणि बुलढाणा जिल्ह्याला पालकमंत्री लाभलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आकडेवारी मात्र सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे. संपूर्ण जिल्ह्यात केवळ २७२ बूथवरच राष्ट्रवादी काँग्रेसला बीएलए नियुक्त करता आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक ताकद नेमकी किती आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या २७२ बीएलएंपैकी सर्वाधिक बीएलए सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील असल्याची माहिती आहे.सध्या जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयआर मोहीम वेगाने सुरू आहे. शासकीय बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करत आहेत. त्याचवेळी विविध राजकीय पक्षांचे बीएलए मतदार याद्यांवरील दुरुस्त्या, हरकती आणि पडताळणी प्रक्रियेवर लक्ष ठेवत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

दरम्यान, समोर आलेली आकडेवारी पाहता बुलढाणा जिल्ह्यात बूथ स्तरावर भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेने मजबूत संघटनात्मक जाळे उभे केले असल्याचे स्पष्ट होत आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अद्याप प्रत्येक बूथपर्यंत पोहोचण्यात यश आलेले नसल्याचे दिसून येते. प्रदेशाध्यक्षांचा जिल्हा असूनही काँग्रेसला सर्व बूथवर प्रतिनिधी उभे करता आले नसल्याने हा विषय राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.