

बुलडाण्याच्या कलेक्टरांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे गंभीर आरोप! म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांचा बोलवता धनी कोण? पगारापेक्षा जास्त बोलतात म्हणाले...मुद्दा केसगळतीचा...
Mar 26, 2025, 14:26 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ,२६ मार्चला विधान भवन परिसरात माध्यमांशी बोलताना बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. "केसगळती प्रकरणात जिल्हाधिकारी डॉ.पाटील पद्मश्री डॉक्टर बावस्कर यांच्या निष्कर्षाला केराची टोपी दाखवतात, त्यांना काय डोक आहे असं म्हणतात..खरे तर कलेक्टर पगारापेक्षा जास्त बोलतात. त्यांचा बोलवता धनी कोण आहे? त्यांच्यावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांचा दबाव आहे का? बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना राज्यमंत्र्यांनी दिल्लीला नेण्याचे आश्वासन दिले आहे का? की राज्य शासनाने त्यांना मुंबईत आणण्याचे आश्वासन दिले? अशा शेलक्या शब्दात हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे..
बुलढाणा जिल्ह्यातील केसगळती प्रकरणात संबंधित गावात गव्हामध्ये १४.५२ पीपीएम इतके जास्त सेलेनियम असल्याचा निष्कर्ष पद्मश्री डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांनी काढला होता. दरम्यान यासंदर्भात २० मार्च रोजी आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सभागृहात माहिती देताना दिशाभूल करीत सेलेनियम बद्दल माहिती देण्याचे टाळल्याचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. त्यामुळे मेघना बोर्डीकर यांच्या विरोधात आ. लिंगाडे यांनी हक्कभंग प्रस्ताव सादर केल्याचे सपकाळ यांनी सांगितले. दरम्यान या मुद्द्यावरून त्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनाही धारेवर धरले. हिम्मतराव बावस्कर यांच्या पद्मश्री पुरस्कारासाठी प्रस्ताव एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असतानाच पाठवण्यात आला होता. असे असताना एका पद्मश्री पुरस्कार प्राप्त माणसाने जर एखादा निष्कर्ष काढला असेल तर तो प्रसिद्धीसाठी काढला असे तुम्ही कसे म्हणू शकता? असे ते जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले. बुलढाण्याचे कलेक्टर पगारापेक्षा जास्त बोलतात अशा शेलक्या शब्दात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर टीका केली..