दोन दिवसांत जाहीर होऊ शकते काँग्रेसची यादी! बुलडाणा जिल्ह्यात कुणाकुणाची लागणार वर्णी? इच्छुकांमध्ये लगबग!
Oct 20, 2024, 15:25 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजले आहेत..राज्यात युती आणि आघाडीचे अंतिम जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेनेत फारसे आलबेल नाही..या पार्श्वभूमीवर आज, २० ऑक्टोबरच्या सायंकाळी दिल्लीत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे.. त्यात उमेदवारांच्या नावांवर चर्चा होऊन पुढच्या दोन दिवसात काँग्रेस उमेदवारांची यादी जाहीर करू शकते अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतील उच्चस्तरीय सूत्रांनी दिली आहे..दरम्यान बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेसच्या वाट्याला किती मतदारसंघ येतात आणि उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडते यावर आता आपापल्या परीने दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत...
बुलडाणा जिल्ह्यात याआधीच्या निवडणुकीत ७ पैकी ६ जागांवर काँग्रेसने उमेदवार दिले होते. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित निवडणूक लढली होती. आता मात्र बरीच राजकीय उलथा-पालथ झाली असून आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत उद्धव ठाकरे यांची शिवसेना सुद्धा लढते आहे. दोन्हीकडे ३ -३ पक्ष आणि जागा ७ असे बुलडाणा जिल्ह्याचे चित्र आहे. त्यात काँग्रेसकडे आज-घडीला केवळ मलकापूर येथे विद्यमान आमदार आहेत.
राष्ट्रवादीकडे सिंदखेडराजात विद्यमान आमदार आहेत. उर्वरित पाचही जागांवर सत्ताधारी महायुतीचे आमदार आहेत महायुतीचे. ७ पैकी मेहकर आणि बुलडाणा जागेवर उबाठा शिवसेना ताकदीने दावा सांगत आहे. सिंदखेडराजा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटेल हे निश्चित आहे.उरलेल्या चिखली, खामगाव, जळगाव जामोद आणि मलकापूर या ४ जागा आतापर्यंत काँग्रेस लढत आल्याने त्या जागा आघाडीत काँग्रेसलाच सुटतील अशी स्पष्ट चिन्हे आहेत.
दावेदार कोण?
चिखली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसची माजी आमदार राहुल बोंद्रे यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. त्यावर केवळ अधिकृत शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. खामगाव येथून माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह इच्छुकांची भलीमोठी यादी आहे. त्यात दिलीपकुमार सानंदा यांचे पारडे जड आहे. मलकापुरातून विद्यमान आमदार राजेश एकडे हेच काँग्रेसच्या उमेदवारीचे दावेदार आहेत.
जळगाव जामोद मधून स्वाती वाकेकर, रामविजय बुरुंगले यांच्यासह जवळपास १० इच्छुक आहेत. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रसेनजीत पाटील हे देखील या मतदारसंघातून उमेदवारी मागत आहेत..वेळ पडल्यास प्रसेन्नजीत पाटील काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत..मात्र आजघडीला जिल्ह्यात कोणत्याही काँग्रेस उमेदवाराची उमेदवारी जाहीर झालेली नाही हेच खरे....