बुलढाणा जिल्ह्यात ८ मंडळांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस! केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी दिले तात्काळ पंचनाम्यांचे निर्देश....

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २१ जुलै रोजी जिल्ह्यातील आठ मंडळ क्षेत्रांत जोरदार ढगफुटीसदृश पावसाने कहर केला. यामुळे घरांचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
लोणार, शेगाव व खामगाव तालुक्यांतील विविध गावांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आणि अनेक गावांत पावसाचे पाणी घरात शिरले. घरांचे तसेच घरातील वस्तूंचे नुकसान झाले असून काही शेतजमिनी खरडूनही गेल्या आहेत.
लोणार तालुक्यातील लोणार येथे १७१.८ मि.मी., टिटवी येथे १५४.५ मि.मी., हिरडव येथे १८४.५ मि.मी. तर शेगाव तालुक्यातील जवळा येथे १७७.३ मि.मी. व खामगाव तालुक्यातील पळशी येथे १५१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. रात्रीच्या वेळेस झालेल्या या मुसळधार पावसामुळे नागरिकांची झोप उडाली आणि अनेक घरांमध्ये पाणी घुसले.
या पार्श्वभूमीवर झालेल्या नुकसानीचे कृषी विभाग, महसूल विभाग व संबंधित पिक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मंत्री प्रतापराव जाधव यांनी संबंधित यंत्रणांनी गतीने काम करून शेतकऱ्यांना व नागरिकांना मदत करण्याचे निर्देशही दिले आहेत.