चिखली बाजार समिती उपसभापतीपदासाठी निवडणूक जाहीर; राजकीय हालचालींना वेग, १८ फेब्रुवारीला मतदानाची शक्यता; उद्धवसेनेतून कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष...
Feb 14, 2026, 11:21 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदासाठी १८ फेब्रुवारी रोजी निवडणूक जाहीर करण्यात आली असून, विद्यमान उपसभापती राम खेडेकर यांनी अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले आहे.
जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या प्रभावी केंद्र मानल्या जाणाऱ्या या बाजार समितीची २०२३ मधील निवडणूक ‘प्रस्थापित विरुद्ध नवखे’ अशा रंगतदार स्वरूपात पार पडली होती. सहकार नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा हस्तक्षेप, तसेच माजी आमदार राहुल बोंद्रे आणि उद्धवसेना नेते प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या एकजुटीमुळे महाविकास आघाडीच्या ‘बळीराजा’ पॅनलने १८ पैकी १७ जागांवर विजय मिळवला होता. पक्षीय समझोत्याप्रमाणे सभापतीपद काँग्रेसकडे देण्यात आले, तर उपसभापतीपद अडीच-अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादी (शरद पवार) आणि उद्धवसेना यांच्यात वाटप झाल्याची चर्चा आहे.
कोणाला मिळणार संधी?
उपसभापतीपद आता उद्धवसेनेच्या वाट्याला येणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. समितीत श्रीकिसन धोंडगे, संतोष वाकडे आणि मंदा भुतेकर हे तीन सदस्य असून, धोंडगे व वाकडे हे प्रा. खेडेकर यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे या दोघांपैकी कोणाची निवड होते की महिला प्रतिनिधी म्हणून मंदा भुतेकर यांना संधी दिली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र
जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी व समृद्ध बाजार समिती म्हणून चिखली बाजार समितीची ओळख आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपसभापतीपदाच्या निवडीला अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून, डॉ. शिंगणे, बोंद्रे आणि प्रा. खेडेकर यांच्या भूमिकेकडे विशेष लक्ष लागले आहे.
निवडणूक कार्यक्रम
१८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० ते १२ या वेळेत समितीच्या शिदोरीगृहात नामनिर्देशनपत्र स्वीकृती, छाननी, वैध अर्जांची प्रसिद्धी, नामनिर्देशन मागे घेणे व अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाणार आहे. आवश्यक असल्यास मतदान होऊन दुपारी सव्वा दोनच्या सुमारास मतमोजणीनंतर निकाल जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.