मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खामगावात आले अन् गेले! जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन केले;पण...
खामगांवमधील घाटपुरी येथील श्री.जय जगदंबा माता संस्थान येथे आयोजित या भूमिपूजन समारंभास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, आमदार आकाश फुंडकर, आमदार संजय गायकवाड, संस्थानाचे अध्यक्ष पंकज केला, उपाध्यक्ष कृष्णकुमार भट्टड, संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथम श्री जगदंबा मातेचे दर्शन घेवून पूजन केले. तसेच जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन करुन कोनशिलेचे अनावरण केले. यावेळी संस्थांनच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी वारकरी संप्रदायांशी संवाद साधला.
शेगावच्या वेशीवर येऊन गेले पण...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर जिथे लँड झाले तिथून संत नगरी शेगाव अवघ्या १० किलोमीटर अंतरावर आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा आज काही फारसा व्यस्त कार्यक्रम नव्हता, एका भूमिपूजन कार्यक्रमासाठी ते वेळ काढून आले होते. त्यामुळे ५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या शेगाव येथेही दर्शनासाठी ते गेले असते तर चांगले झाले असते.