विजयी मिरवणुकीत नोटा उधळणे भोवले; मलकापूरचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अतिकभाई जवारीवाले यांच्यावर गुन्हा दाखल; समाज माध्यमावर व्हायरल झाला होता व्हिडीओ...
Dec 30, 2025, 19:49 IST
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर विजयाचा आनंद साजरा करताना नोटा उधळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मलकापूर येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष अतिकभाई जवारीवाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपमुख्याधिकारी विठ्ठल भुसारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी विठ्ठल बाळासाहेब भुसारी, उपमुख्याधिकारी, नगरपरिषद मलकापूर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता, मलकापूर शहरातील लोखंडी रेल्वे पुलाजवळ, पारपेठकडील बाजूस नवनिर्वाचित नगराध्यक्ष अतिकभाई जवारीवाले यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बोलावून विजय उत्सव साजरा केला.या उत्सवादरम्यान अतिकभाई जवारीवाले यांनी स्वतः नोटा उधळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. सदर प्रकार हा नगरपरिषद निवडणूक २०२५ साठी लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारा असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशांचे उल्लंघन झाल्याने पोलीस प्रशासनाने दखल घेतली. या प्रकरणी पोलीस हवालदार मोहम्मद रिजवान यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश रोकडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणात अद्याप कोणताही मुद्देमाल जप्त करण्यात आलेला नसल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, नवनिर्वाचित नगराध्यक्षांवर गुन्हा दाखल झाल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, निवडणुकीनंतरच्या विजय उत्सवावर आणि आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
