अखिल भारतीय सरपंच परिषदेची बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी गठीत! अध्यक्षपदी अनिल फेपाळे, उपाध्यक्ष श्याम पाटील सावळे तर कार्याध्यक्षपदी आस्तिक वारे...

 

 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अखिल भारतीय सरपंच परिषदेची बुलढाणा जिल्हा कार्यकारीणी गठीत करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षपदी रुईखेड मायंबाचे सरपंच अनिल फेपाळे, उपाध्यक्षपदी डोंगरखंडाळा उपसरपंच श्याम पाटील सावळे तर कार्याध्यक्ष म्हणून देवपूरचे सरपंच आस्तिक वारे यांची नियुक्ती करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत येथील आराध्या लॉन्समध्ये ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत ही निवडप्रक्रिया पार पडली.

सरपंचांचे प्रश्न सोडवण्यासाठी आजपर्यंतच्या केलेल्या कार्याची दखल घेऊन तसेच १५ लाख रुपयापर्यंत विकासकामे करण्याचा ग्रामपंचायतचा अधिकार पूर्ववत मिळवणे, आणि सरपंच उपसरपंचांचे मानधन दुप्पट होण्यामध्ये मोलाची भूमिका बजावल्याबद्दल बुलढाणा जिल्ह्यातील सरपंचांच्यावतीने संघटनेचे संस्थापक अध्यख जयंत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना ते म्हणाले की, ग्रामीण महाराष्ट्र, गावखेडी आणि ग्रामस्थांसाठी सरपंचांनी पक्षाचे जोडे बाजूला ठेवून काम केल्यास विकास सहज शक्य आहे. सरपंच झाल्यानंतर गावच्या विकासाला प्राधान्य देऊन प्रत्येक गावकरी समान समजून काम केल्यास मोठे परिवर्तन घडते. सरपंचांनी ग्रामपंचायत चालवण्याबरोबरच शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शेतकरी गट, फार्मर प्रोडूसर कंपन्या स्थापन कराव्या. ज्याद्वारे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळेल.

​​​

​​​​​त्याचप्रमाणे आपल्या गावातील प्राथमिक शिक्षण, आरोग्य, स्वच्छता याबाबत विशेष लक्ष देऊन गावचा विकास साधावा असे आवाहन केले. भविष्यकाळात सरकारकडून सरपंच, उपसरपंच यांना विमा संरक्षण व पेन्शन लागू करण्यासंदर्भात प्रयत्न केले जातील, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत सदस्य व पंचायत समिती सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळवून देण्याचा संकल्प केला. गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत शासनाच्या असणाऱ्या सर्व कमिट्यांमध्ये सरपंच प्रतिनिधी असावाच ही मागणी लावून धरण्यात येईल.

परंतु त्यासाठी सरपंचांची एकजूट अत्यावश्यक असल्याचे जयंत पाटील म्हणाले. सरपंच परिषदेच्या नूतन जिल्हा कार्यकारणी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. लवकरच तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात येतील असे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी येळगावचे सरपंच दादा लवकर, सतीश पाटील, संजय काळवाघे, नागेश पाटील, गजानन वतपाव, मधुकर महाले, प्रल्हाद सुलताने, पवन वाघ, गजानन भोलाने, प्रदीप तिकडे, विष्णू खैंबटकर, जगन्नाथ वाघ, विष्णू शेळके, योगिनी भागवत पवार, छाया अंभोरे, संजय पाटील, डॉ. विजय तेजनकर, रामेश्वर बुधवत, भगवान रिंढे, भिकनराव भुतेकर, रामभाऊ जाधव, जनार्धनआप्पा सूसर, अजय गायकवाड, विलास महाराज शेळके, सचिन खेडेकर विनोद कणखर, अर्जुन दांडगे, प्रदीप सोळंकी, चेतन मस्के, सत्यभामाताई बोर्डे, प्रज्ञाताई कांबळे, हर्षल आडवे, संजय उबरहंडे, राधाताई देठे, पंडित हिवाळे, संजय मोरे, अंजना केदारे, राजाराम पिंपळे, संजय शिंदे, संदीप सानप, राजू वाघ, गणेश भोंडे, जीवन तायडे, प्रशांत गाढे आदींनी परिश्रम घेतले.