BREAKING अरेच्चा! कहानी में ट्विस्ट! राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी म्हणतात सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ अजित पवार गट ताकदीने लढणार..!
Oct 18, 2024, 19:55 IST
सिंदखेडराजा (बाळासाहेब भोसले:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट)जिल्हाध्यक्ष ॲड नाझेर काझी यांच्या भूमिकेने सगळ्यांनाच कोड्यात टाकले आहे. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाची जागा अजित पवार गट ताकदीने लढणार .. मी अजित पवार यांच्यासोबतच आहे अशी भूमिका ॲड. नाझेर काझी यांनी घेतली आहे. सिंदखेड राजा येथे एका पत्रकार परिषदेत तेआज,१८ऑक्टोबरला बोलत होते. विशेष म्हणजे दोन दिवसांपुर्वी डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी बोलावलेल्या कार्यकर्ता मेळाव्याचे संयोजक ॲड. नाझेर काझी हेच होते..
जिल्ह्यात एकूण सात मतदार संघ आहेत, त्यातील सहा जागांवर मित्रपक्ष लढणार आहे. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाची जागा अजित पवार गट ताकदीने लढणार असल्याचे ते म्हणाले. डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या विषयी ॲड. नाझेर काझी यांना विचारणा केली असता त्यांनी अद्याप कोणताही निर्णय अधिकृतरित्या जाहीर केलेला नाही, त्यामुळे त्यावर बोलणे उचित होणार नाही असे ते म्हणाले. बुलडाणा जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकारी अजित दादा पवार यांच्यासोबत आहेत, आम्ही महायुती म्हणून पुढे काम करणार असल्याचे ॲड. नाझेर काझी म्हणाले.. काझी यांच्या भूमिकेमुळे आधीच बुचकळ्यात पडलेले महायुती आणि महाविकास आघाडीचे इच्छुक पुन्हा एकदा गोंधळात पडले आहेत....