मंत्री आकाश फुंडकरांकडे भाजपने सोपवली विशेष जबाबदारी! बुलडाणा जिल्ह्यासाठी करावे लागणार खास काम...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कुठेही नाव स्पर्धेत आणि चर्चेत नसताना कॅबिनेट मंत्री पदाची लॉटरी लागलेली ना. आकाश फुंडकर यांच्यावर भाजपने आता विशेष जबाबदारी सोपवली आहे. आकाश फुंडकर यांना बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यात येईल अशी चर्चा सर्वत्र होती मात्र बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेले आणि आकाश फुंडकर यांच्याकडे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र आता पक्ष संघटनेच्या दृष्टीने ना. आकाश फुंडकर यांच्यावर महत्त्वाचे काम सोपवण्यात आले आहे...

   स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांचा वारसा समर्थपणे चालवणारे आकाश कुंडकर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात कामगार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. संजय कुटे, श्वेताताई महाले ही नावे मंत्री पदासाठी आघाडीवर असताना एकाएकी आकाश फुंडकर यांचे नाव मंत्री पदासाठी समोर आले होते. आता भाजपने आकाश फुंडकर यांच्यावर पुन्हा महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आकाश फुंडकर यांना बुलढाणा जिल्ह्यासाठी "संपर्क मंत्री" म्हणून नियुक्त केले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील पक्ष संघटन  व सरकारमधील समन्वय साधण्याचे काम आकाश फुंडकर यांना करावे लागणार आहे.