BREAKING स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात सर्वोच्च न्यायालयातून मोठी अपडेट... जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संदर्भात सर्वोच्च न्यायालयातून मोठी अपडेट आली आहे. ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनेच्या मुद्द्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. आज,४ मार्चला सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात सुनावणी झाली. यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतरच होतील की काय? अशा चर्चा सुरू झाल्या आहे..

  सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवेळी राज्य सरकारच्या वतीने तुषार मेहता यांनी वेळ मागून घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला काही कागदपत्रे मागितली आहेत. यानंतर पुढच्या वेळी सुनावणी करू असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर जाण्याची चिन्हे आहेत..
 राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकराज सुरू आहे. अनेक महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका प्रलंबित आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुका झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लगेच होतील अशी दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना आशा होती. मात्र सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पुढे ढकलल्यामुळे आता ती मावळत चालली आहे. होळीमुळे ९ ते १६ मार्च दरम्यान सर्वोच्च न्यायालयाला सुट्टी आहे. त्यानंतर न्यायालयाकडून सुनावणीची तारीख दिल्या जाईल व त्या तारखेला सुनावणी होईल. यात एप्रिल चा पहिला आठवडा उजाडावा लागू शकतो. "त्या" तारखेवर सुनावणी झाली नाही तर सर्वोच्च न्यायालयाला उन्हाळी सुट्ट्या लागतील, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतरच होऊ शकतात असा अंदाज आहे..