मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुका आता पुढच्या वर्षीच! फेब्रुवारी किंवा एप्रिलनंतरच तापणार गावगाड्याचे राजकारण...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यातल्या नगरपरिषदांसाठी आज,२ डिसेंबरला मतदान झाले. निवडणूक आयोगाकडून लांबणीवर टाकण्यात आलेल्या नगरपालिकांमध्ये २० डिसेंबरला मतदान होईल. उद्या, ३ डिसेंबरला पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार निकाल अपेक्षित असताना उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल आता २१ डिसेंबरला लागणार आहे. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाच्या या संपूर्ण गोंधळामुळे याचा थेट परिणाम आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकांवर होणार आहे. आधीच आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेचात सापडलेल्या निवडणुका आता पुन्हा लांबणीवर जाणार आहेत.
जिल्हा परिषदांच्या निवडणुका आता कोणत्याही परिस्थितीत २०२५ मध्ये होऊच शकणार नाही. आता या निवडणुका थेट पुढच्या वर्षी होतील. त्याआधी महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू आहे. पुढील आठवड्यात विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आहे..त्यानंतरच महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होईल. या निवडणुका जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चालतील. त्यामुळे एक तर फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात नाहीतर थेट एप्रिल महिन्यातच आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील अशी चिन्हे आहेत.
  ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्यावरून राज्यातील दोन महानगरपालिका आणि १७ जिल्हा परिषदांच्या निवडणुका अडचणीत आहेत. जिल्हा परिषदांच्या तुलनेत महानगरपालिकांच्या निवडणुका आणि नव्याने आरक्षण सोडत घेणे सोपे आहे. कारण केवळ दोन महानगरपालिकेत आरक्षण मर्यादेचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे जिथे ५० टक्के आरक्षण मर्यादेची उल्लंघन नाही अशा जिल्हा परिषदा आणि २९ महानगरपालिकांच्या निवडणुका एकत्रित होऊ शकतात.
मात्र जिथे ५० टक्के आरक्षण मर्यादेचे उल्लंघन झालेले आहे अशा निवडणुका लांबणार आहेत.
निवडणुका लांबण्याचा दुसरा मुद्दा असा की, नगरपालिकांचे निकाल २१ डिसेंबर पर्यंत लांबणार असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कमतरता यंत्रणेकडे आहे.
नगरपालिका निवडणुकांचे निकाल राजपत्रात प्रसिद्ध होईपर्यंत सध्या असलेले उपविभागीय अधिकारी दर्जाचे निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या कर्तव्यातून मुक्त होऊ शकत नाहीत. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची उपलब्धता झाल्यानंतरच यापुढील निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयाकडे ३१ जानेवारीच्या मुदतीत वाढ देण्याची मागणी करणार आहे.३१ जानेवारीच्या आता महानगरपालिकांच्या निवडणुका घेणे सध्या तरी शक्य आहे..त्यामुळे गावगाड्याचे राजकारण उन्हाळ्यातच तापणार आहे...