मोठी बातमी! आ. संजय गायकवाड यांच्या आरोपांनी खळबळ; म्हणाले जिल्ह्यातील महायुतीचे काही नेते माझ्या प्रगतीचे शत्रू!

 ना.प्रतापराव जाधव, संजय कुटेंचा उल्लेख; विजयराज शिंदेंनी "त्या" पैशातून गाडी घेतली म्हणाले....

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ): बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड आपल्या वक्तव्यांनी नेहमी चर्चेत असतात. आता त्यांनी महायुतीच्या जिल्ह्यातील काही नेत्यांवर गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. जिल्ह्यातील महायुतीचे काही नेते माझ्या प्रगतीचे शत्रू आहेत असा सनसनाटी आरोप आ.संजय गायकवाड यांनी केला आहे. आज,२८ डिसेंबरला बुलढाणा येथील मातोश्री जनसंपर्क कार्यालयावर पत्रकारांशी संवाद साधताना आ. गायकवाड यांनी गंभीर आरोप केले आहेत...
 विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधण्याकरता बुलडाण्याचे आ. गायकवाड यांनी बैठक बोलावली. त्यानुसार, आज २८ डिसेंबर रोजी मातोश्री जनसंपर्क कार्यालय त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकी दरम्यानचा घटनाक्रम सांगत असताना ते म्हणाले, जिल्ह्यातील महायुतीच्या काही नेत्यांमुळे माझे मताधिक्य घटले. मी केलेली विकास कामे तसेच माझ्या प्रगतीचे शत्रू काही नेते बनले आहेत. यामध्ये, खासदार प्रतापराव जाधव, आ. संजय कुटे यांनी माझ्या विरोधात प्रचार केला असे आ.गायकवाड म्हणाले. एवढेच नाही तर भाजपचे विजयराजे शिंदे यांनी माझ्या विरोधात प्रचार करण्यासाठी पाच कोटी रुपये घेतल्याचा आरोप मी त्याआधीही केलेला आहे.त्या पैशातूनच शिंदे यांनी नवीन गाडी घेतल्याचे आ. गायकवाड म्हणाले.२० हजार मते महाविकास आघाडीला मिळण्यासाठी युतीच्या नेत्यांनी प्रयत्न केल्याचे आ.गायकवाड म्हणाले. मात्र याचा अर्थ शिवसेनेत फूट पडेल असा नाही असेही आ. गायकवाड म्हणाले..