मोठी बातमी! आमदार संजय कुटे यांची ताकद वाढली; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सोपवली मोठी जबाबदारी; प्रदेश महामंत्रीपदी निवड; विदर्भ विभागाची संघटनात्मक जबाबदारी...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली असली तरी त्यांची संघटनात्मक ताकद आता वाढली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज प्रदेश कार्यकारणीची  घोषणा केली, या कार्यकारणीत आ. संजय कुटे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. संजय कुटे यांच्याकडे भाजपच्या प्रदेश महामंत्री( सरचिटणीस )म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.  महामंत्री या नात्याने आ.संजय कुटे यांच्याकडे विदर्भ विभागाची संघटनात्मक जबाबदारी राहणार आहे. याआधी ही जबाबदारी अकोल्याचे आ. रणधीर सावरकर यांच्याकडे होती.

  भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज, २४ फेब्रुवारीला सकाळी पत्रकार परिषद घेत प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. ४३ जणांच्या या मुख्य कार्यकारणीत बुलडाणा जिल्ह्यातील आ.संजय कुटे यांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात आ.कुटे यांच्यावर अमरावती महानगरपालिकेची प्रभारी म्हणून जबाबदारी होती, ती यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर आता आ.कुटे यांचा पक्ष संघटनेत दबदबा वाढला आहे. भाजपच्या संघटन रचनेत एका विभागातून एक महामंत्री (सरचिटणीस) देण्यात आले आहेत, यात आ.संजय कुटे यांना विदर्भातून स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे विदर्भाच्या संघटनात्मक प्रक्रियेत आ.कुटे यांचे स्थान वाढले आहे.