मोठी बातमी! माजी आमदार दिलीप कुमार सानंदा शिवसेनेच्या वाटेवर? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना घरातूनच सुरुंग....
Updated: Mar 11, 2025, 18:02 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती गेल्या महिन्यात झाली. आता महाराष्ट्रात काँग्रेसला अच्छे दिन येतील अशी अपेक्षा महाराष्ट्रभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांना असतानाच हर्षवर्धन सपकाळ यांच्या बुलढाणा जिल्ह्यातच मात्र काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत.. हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या नियुक्तीचे जिल्ह्याच्या सर्वसामान्य वर्तुळातून स्वागत होत असतानाच जिल्हा काँग्रेसमध्ये मात्र फारसा उत्साह दिसला नव्हता. माजी जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, घाटाखालील काँग्रेस नेते गणेश राजपूत यांच्यासह इतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेला आहे.. अशातच आता खामगावचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आज,११ मार्चला दिलीप कुमार सानंदा यांची उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या समवेत मुंबईत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड हे देखील यावेळी उपस्थित होते. संजय गायकवाड बुलढाणा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आहेत, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याभरात शिवसेना संघटन मजबूत करण्याकडे गायकवाड लक्ष देत आहेत.
२०१४ पासून दिलीप कुमार सानंदा सत्तेपासून दूर आहेत. विलासराव देशमुख हयात असताना दिलीप कुमार सानंदा यांचा काँग्रेसमध्ये चांगलाच दबदबा होता. मात्र विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर दिलीप कुमार सानंदा काँग्रेसमध्येही अडगळीत पडल्यासारखेच होते. सानंदा यांची अडचण एवढी होती की नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सानंदा यांना काँग्रेसचे तिकीट मिळते की नाही? अशी देखील चर्चा सुरू होती. काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढल्यानंतर दिलीप कुमार सानंदा यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा सानंदा यांना फटका बसलाच.त्यातच आता राज्यात पूर्ण बहुमताचे महायुतीचे सरकार आल्याने सानंदा यांना असुरक्षितता वाटत असावी,
त्यामुळे ५ वर्षे विरोधी पक्षात राहून व्यावसायिक नुकसान सहन केल्यापेक्षा सत्तेत जाण्याचा दिलीप कुमार सानंदा यांचा विचार असावा. त्यामुळे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या पुढाकारातून दिलीप कुमार सानंदा शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे.
वासनिकांचे समर्थक काँग्रेस का सोडत आहेत?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील अनेक काँग्रेस नेते शिवसेनेच्या वाटेवर आहेत. खास करून मुकुल वासनिक यांच्या जवळची समजली जाणारी नेतेमंडळी शिवसेनेत प्रवेश करत आहेत. बुलढाण्याचे काँग्रेस नेते संजय राठोड हे देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचे शिवसेनेत होत असलेले प्रवेश वासनिक यांच्या मुकसंमतीने तर होत नसावेत ? अशी एक चर्चा देखील राजकीय गोटात सुरू आहे...