BIG BREAKING सिंदखेडराजात मॅटर पांगले! महायुतीचा खेळखंडोबा; डॉ.शशिकांत खेडेकर यांना शिंदेच्या शिवसेनेने उमेदवारी दिल्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मनोज कायदेंना दिली उमेदवारी....
Oct 29, 2024, 11:57 IST
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राजकारणात कोणत्या क्षणाला काय होईल याचा काहीही नेम नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून महायुतीमध्ये सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचा तिढा सुरू होता. काल रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने माजी आमदार शशिकांत खेडेकर यांना उमेदवारी जाहीर केली. खेडेकर आज उमेदवारी अर्ज देखील भरणार आहेत. मात्र आता महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात आपला उमेदवार दिला असून उमेदवाराला एबी फॉर्म देखील दिला आहे. मनोज कायंदे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिली असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी मनोज कायंदे यांच्या नावाचा एबी फॉर्म पक्ष कार्यालयातून आणला आहे. स्वतः मनोज कायंदे यांनी "बुलडाणा लाइव्ह "शी बोलताना याबद्दलची पुष्टी केली असून थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही ते म्हणाले.
अजित पवारांच्या या निर्णयामुळे महायुतीमध्ये खळबळ उडाली असून महायुतीचा खेळखंडोबा होतो की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मनोज कायंदे यांना मैदानात उतरवण्याची खेळी कुणाची? कशासाठी याबद्दल आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. डॉक्टर राजेंद्र शिंगणे विरुद्ध शशिकांत खेडेकर अशी लढत होईल अशी चिन्हे असताना आता या लढतीत मनोज कायंदे यांचीही एन्ट्री झाली आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून चार नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.. त्यामुळे ही लढत कायम राहते की अजित पवार माघार घेतात हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईल.. मात्र या निर्णयामुळे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच पांगण्याची चिन्हे आहेत...