BIG BREAKING रविकांत तुपकरांना पोलिसांनी ताब्यात घेतले, बुलडाण्यात तणाव; तुपकर समर्थकांकडून प्रचंड घोषणाबाजी...
Sep 26, 2024, 20:33 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पिक विम्याच्या प्रश्नावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज, दुपारी २ वाजेपासून जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात मुक्कामी आंदोलन सुरू केले होते. अंथरून पांघरून आणि बॅग घेऊनच ते जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात पोहोचले होते.
जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी घेतली होती.. दुपारपासून प्रशासकीय पातळीवर या संदर्भात तोडगा काढण्यासाठीचे प्रयत्न सुरू होते. मात्र रविकांत तुपकर आंदोलनावर ठाम होते. तुपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हाभरातील शेतकरी बुलडाण्यात पोहोचणे सुरू होते.अखेर कायदा व सुव्यवस्था हे कारण पुढे करीत पोलिसांनी रविकांत तुपकर यांना ताब्यात घेतले आहे. सव्वा आठ वाजेच्या सुमारास पोलिसांनी तुपकर यांना ताब्यात घेतले. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय समोर जमलेल्या शेतकऱ्यांनी तसेच तुपकर यांच्या समर्थकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है...अशा घोषणा शेतकऱ्यांकडून देण्यात आल्या.
गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही...
दरम्यान रविकांत तुपकर यांनी पोलीस कारवाईचा निषेध केला आहे. पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत असा आरोप तुपकर यांनी केला. मला गोळ्या घातल्या किंवा फासावर चढवले तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या मागण्यावरून मागे हटणार नाही अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी दिली आहे.