BIG BREAKING आदेश धडकले हो! जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी प्रशासनाची लगबग; १८ ऑगस्ट पर्यंत अंतिम प्रभाग रचना होणार! बुलडाणा जिल्हा परिषदेच्या ६० जागा की ६८, मुद्दा क्लिअर....?

 
 बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात चार महिन्यांच्या आत घेण्याचे आदेश मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दिले होते..त्याला महिना उलटून गेल्यानंतर आता निवडणुका घेण्यासाठी प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे.. ११ जूनला नगरपालिका आणि महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले होते, आता काल,१२ जूनच्या रात्री जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी देखील प्रभाग रचना करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने तसे निर्देश दिले आहेत..१८ ऑगस्ट २०२५ रोजी अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेला मान्यता दिल्यानंतर निवडणुकीची पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे, त्यामुळे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यांत जिल्हा परिषदांच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे.

   बुलढाणा जिल्हा परिषदेचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२२ मध्येच संपला आहे. तेव्हापासून जिल्हा परिषद प्रशासकांच्या हातात आहे. महाविकास आघाडी सरकार असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या गणांची संख्या ६० वरून ६८ करण्यात आली होती. आरक्षण सोडत देखील निघाली होती..मात्र जून २०२२ मध्ये राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार सत्तेत आले. त्यानंतर महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय रद्द करण्याचा सपाटा माहिती सरकारने लावला. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात महाविकास आघाडीने जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या गणवाढीचा घेतलेला निर्णय देखील महायुतीने रद्द केला. शिवाय महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात निवडणुकी संदर्भात झालेला सर्व कार्यक्रम देखील रद्द समजण्यात येईल असा अध्यादेश देखील तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झाला होता.. त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. मे २०२५ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांचे आत घ्याव्यात असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले..आता राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे.. काल,१२ जूनला जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने प्रभाग रचना तयार करण्याचे निर्देश दिले आहेत..
असा आहे कार्यक्रम..
ग्राम विकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार १४ जुलै २०२५ पर्यंत जिल्हाधिकारी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करणार आहेत. त्यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी २१ जुलै पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. आलेल्या हरकती आणि त्यावरील अभिप्राय विभागीय आयुक्तांना सादर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना २८ जुलै पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन निर्णय देण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना असून त्यासाठी विभागीय आयुक्तांना १९ ऑगस्ट २०२५ पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे..त्यानंतर अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे सादर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना १८ ऑगस्ट पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे..त्यांनंतर निवडणुकांसाठी पुढील रचना करण्यात येईल.. एकंदरीत या रचनेनुसार नगरपालिकांच्या आधीच जिल्हा परिषदांच्या निवडणुका होतात की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे..
बुलढाणा जिल्हा परिषदेचे गट ६० की ६८?.
महाविकास आघाडी सरकारने बुलढाणा जिल्हा परिषदेच्या गटांची संख्या ६० वरून ६८ केली होती. त्यामुळे आता तीच गट रचना असेल की वेगळी गटाराचना होईल याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम सुरू होते. मात्र राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने काल,१२ जून रोजी प्रसिद्ध केलेल्या शासन आदेशानुसार प्रभाग रचना करण्यासाठी लगतच्या जनगणनेचा आधार घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे त्यासाठी यंत्रणेला २०११ च्या जनगणनेचा आधार घ्यावा लागणार आहे. याशिवाय सदस्य संख्या ठरवताना १२ सप्टेंबर २०२२ रोजी केलेल्या सुधारणेनुसार म्हणजेच जिल्हा परिषदांची सदस्य संख्या ७५ पेक्षा जास्त नसावी व ५० पेक्षा कमी नसावी असे शासन आदेशात म्हटले आहे. याचाच अर्थ महाविकास आघाडीने वाढवलेली गटांची संख्या आता रद्द समजण्यात येईल. महाविकास आघाडीने जिल्हा परिषदेच्या गटांची संख्या कमीत कमी ५५ व जास्तीत जास्त ८५ अशी केली होती.. काल शासनाने प्रसिद्ध केलेल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे की, निवडणूक विभाग व निर्वाचक गण रचना करताना २०१७ च्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांची प्रभाग रचना विचारात घेऊन कार्यवाही करावी. याशिवाय राज्य शासनाने प्रसिद्धी दिलेल्या आदेशानुसार बुलढाणा जिल्हा परिषदेसाठी ६१ सदस्य संख्या निश्चित करण्यात आल्याचे म्हटले आहे..त्यामुळे ६० की ६८ हा मुद्दा आता क्लिअर झाला आहे.. त्यामुळे बुलढाणा जिल्हा परिषदेसाठी ६१ जागांसाठी निवडणूक होणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे...