BIG BREAKING अजित पवारांच्या राष्ट्रवादीत धुसफूस! महिला जिल्हाध्यक्ष अनुजा सावळे यांचा राजीनामा; ॲड. नाझीर काझी अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप....
Updated: Feb 4, 2025, 18:59 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा निवडणुकीत सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार मनोज कायंदे यांचा विजय झाला. विशेष म्हणजे जिल्ह्याला पालकमंत्री पदही राष्ट्रवादीच्या वाट्यालाच आले. सगळीकडे खुशीचा माहोल असताना या आनंदात आता मिठाचा खडा पडला आहे.. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा अनुजा सावळे यांनी तडकाफडकी आपला राजीनामा दिला आहे. राजीनाम्याचे खापर त्यांनी जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांच्यावर फोडले आहे.
अनुजा सावळे यांनी आपल्या फेसबुक पेजवर राजीनाम्याची पोस्ट केली आहे. राजीनाम्यावर तारीख १९ डिसेंबर असली तरी त्यांनी आज, ४ फेब्रुवारीला थोड्या वेळापूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. गेल्या ४ वर्षापासून मी निष्ठेने पक्षाचे काम केले, प्रामाणिकपणे महिला संघटनेचे काम वाढवले मात्र जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी सतत अपमानजनक वागणूक दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.. निष्ठावान लोकांना डावलून पक्ष संघटना टिकणार नाही, जातीयवाद फोपावला तर सामान्यांना न्याय मिळणार नाही. मराठा समाजातील सक्षम महिला म्हणून अशा प्रकारे मला राजीनामा द्यावा लागणे निराशाजनक असल्याचीही अनुजा सावळे यांनी म्हटले आहे...