सत्तेत असुन आमदार गायकवाडांवर वाईट वेळ! मंत्रालयाच्या गच्चीवर १२ सप्टेंबरपासून उपोषण करणार; नेमकं झालं तरी काय?

 
बुलडाणा

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय..तुम्ही वाचताय ते खरं हाय..बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड खरंच उपोषणाला बसणार आहेत..सत्तेत असूनही विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक असुनदेखील आ.गायकवाड यांच्यावर वाईट वेळ आली आहे. स्वतः आमदार गायकवाड यांनीच आपण उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले आहे. एका मराठी वृतवाहीनिशी बोलतांना आमदार गायकवाड यांनी त्याबद्दल माहिती दिली. अधिकाऱ्यांमुळे कामे अडकून पडली आहेत, त्यामुळे उपोषण करणार असल्याचे आ. गायकवाड म्हणाले.

 मुख्यमंत्र्यांनी एक वर्षा आधी आमदारांच्या कामासंदर्भात बैठक घेतली. आदेश काढण्याच्या सूचना केल्या, मात्र १ वर्ष होऊनही आदेश निघाले नाहीत. त्यामुळे कामे खोळंबली आहेत. मुख्यमंत्र्यांनी २४ ऑगस्टला पुन्हा बैठक घेऊन कामासंदर्भात आदेश काढा म्हटले. तरीही आदेश निघाले नाहीत.
 
मुख्यमंत्री राज्यभर फिरतात,धडपड करतात. अधिकाऱ्यांनी मात्र केवळ खुर्च्या उबवण्याचे काम करायचे का? असा सवाल करीत अधिकाऱ्यांच्या विरोधात मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर उपोषणाला बसणार असल्याचे आ.गायकवाड म्हणाले. जोपर्यंत कामाचे आदेश निघणार नाहीत तोपर्यंत खाली उतरणार नाही असे "त्या" वृत्तवाहिनीशी बोलताना आ.गायकवाड म्हणाले.